पुणे : दुसऱ्या पीवायसी-स्वोजस एंटरप्रायझेस टेनिस लीग साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत व्हॅली हंटर्स संघाने बेल्फिन्स टायगर्स संघाचा 6-2 (9.5-7.5) असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
अंतिम फेरीत व्हॅली हंटर्स संघाने बेल्फिन्स टायगर्स संघाचा 6-2 असा पराभव केला. सामन्यात गोल्ड दुहेरी 1मध्ये टायगर्स संघाच्या रघुनंदन बेहेरे व तनिश बेलगलकर यांनी हंटर्सच्या सारंग देवी व क्षितिज कोतवाल यांचा 5-2 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर गोल्ड दुहेरी 2 मध्ये केदार नाडगोंडेने अथर्व अय्यरच्या साथीत टायगर्स मधुर इंगळहळीकर व नकुल फिरोदिया यांचा 5-2 असा पराभव करून बरोबरी साधली.
सिल्व्हर दुहेरी 3 मध्ये हंटर्सच्या अयान जमेनिस व पराग टेपण या जोडीने अन्विता टेपन व रिषभ बेहेरे यांचा 4-2 असा, तर सिल्व्हर दुहेरी 4 प्रकारांत हंटर्सच्या राहुल कुलकर्णी व यश शहा यांनी टायगर्सच्या आरिका ताम्हाणे व विश्वेश कटककर यांचा 4-2 असा पराभव करून ही आघाडी अधिक भक्कम केली.
ब्रॉन्झ दुहेरी 1 मध्ये हंटर्सच्या भाग्यश्री देशपांडे व जान्हवी कोरे यांनी टायगर्सच्या चारुदत्त साठे व अमीर आजगावकर यांचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.