Purandar Election Campaign Pudhari
पुणे

Purandar Election Campaign: पुरंदरमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; ढाब्यांपासून बैठकींपर्यंत धामधूम

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीआधी प्रचार शिगेला, कार्यकर्त्यांची ‘खाण्या-पिण्याची’ चंगळ

पुढारी वृत्तसेवा

अमृत भांडवलकर

सासवड: पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बार 7 फेबुवारीला उडणार असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुका सध्या राजकीय हालचालींनी ढवळून निघाला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना (उबाठा) आणि काँग््रेास यांच्यात अत्यंत चुरशीची व काट्याची लढत असल्याने निकालाचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. गुरुवारी (दि. 5) रात्री 10 वाजता अधिकृत प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या, तरी शुक्रवारचा संपूर्ण दिवस व रात्र ही प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याच काळात अनेक ठिकाणी दिवस-रात्र लक्ष्मीदर्शनाचे प्रयोग रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक म्हटली की उमेदवार व कार्यकर्त्यांचे काटेकोर नियोजन आलेच. त्यात जेवणावळींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही याला अपवाद ठरलेल्या नाहीत. त्यामुळेच पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, निरा शहरांसह परिसरातील ढाबे व हॉटेलांमध्ये सध्या रंगतदार मेजवान्यांची चांगलीच धामधूम सुरू आहे. अनेक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी हॉटेल आरक्षित करण्यास सुरुवात केली असून, काही इच्छुक उमेदवारांच्या घरीही जेवणावळी देत कार्यकर्ते व मतदारांची विशेष काळजी घेतली जात आहे.

प्रचाराला गती देण्यासाठी कार्यकर्ते ठणठणीत हवेत, याची उमेदवारांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या बाबतीत कोणतीही कसूर राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. पुरंदर तालुक्यातील विविध हॉटेल्स सध्या महत्त्वाच्या बैठका आणि नियोजनासाठी उपयुक्त ठरत असून, या निवडणुकीत ‌‘ढाबासंस्कृती‌’ विशेष चर्चेत आली आहे. तालुक्यात अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्याने कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची चंगळ पाहायला मिळत आहे. पहिल्या फळीतील पदाधिकारी व आर्थिकदृष्ट्‌‍या सक्षम कार्यकर्ते कधी-कधी हा खर्च स्वतः उचलताना दिसत आहेत.

सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना (उबाठा) आणि काँग््रेास यांच्यात घमासान सुरू आहे. ठरावीक कार्यकर्त्यांना जेवणाची वेळ व ठिकाण आधीच कळविले जाते. त्याचबरोबर दिवसभराच्या प्रचाराचे सविस्तर नियोजनही सांगितले जाते. “उद्या सकाळी सात वाजता अमुक ठिकाणी या,” असा निरोप मिळाल्यावर कशासाठी यायचे? असा प्रतिप्रश्न कोणी विचारत नाही. वेळ नाही, असेही कोणी म्हणत नाही. एकूणच, सध्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ सुरू असल्याचे चित्र आहे.

235 केंद्रांवर होणार मतदान

पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे गराडे, वीर, बेलसर आणि निरा-शिवतक्रार असे एकूण चार गट आहेत, तर पंचायत समितीचे गराडे, दिवे, वीर, भिवडी, बेलसर, माळशिरस, निरा-शिवतक्रार आणि कोळविहिरे असे आठ गण आहेत. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या 1 लाख 89 हजार 403 इतकी असून, त्यामध्ये 95 हजार 271 पुरुष, 94 हजार 129 महिला आणि तीन इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण 235 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT