सासवड: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सुरू असलेल्या विविध कृषी योजनांद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 2025-26 या वर्षात पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांची निवड विविध योजनांसाठी करण्यात आली आहे. यात 2 हजार 998 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळाल्याचे कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथे तहसील कार्यालयासमोर ट्रॅक्टर योजनेतून सोमर्डीचे शेतकरी संगीता श्याम भोराडे यांना ट्रॅक्टर मिळाला. या वेळी कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, कुंभारवळणचे माजी सरपंच सचिन पठारे, खरेदी-विक्री संघाचे संचालक शांताराम भोराडे, घनश्याम ताठेले, पांडुरंग भोराडे, संतोष भोराडे, विलास ताठेले, रमेश ताठेले, उत्तम ताठेले, विष्णू भोराडे, नाना भोराडे, विश्वास भोराडे, संजीवन भोराडे, सुरेश भांडवलकर आदी शेतकरी उपस्थित होते.
महाडीबीटी प्रणाली अंतर्गत ठिबक, तुषार, सामुहिक शेततळे, फळबाग लागवड, कांदा चाळ, कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या योजनांमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड ’प्रथम अर्ज, प्रथम निवड’ या तत्त्वावर करण्यात आल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विहित मुदतीत कागदपत्रे द्यावीत
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 10 दिवसांत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर सादर करावीत. विहित मुदतीत कागदपत्रे सादर केली नाही तर संबंधित लाभार्थ्यांची निवड रद्द होऊ शकते. कागदपत्र सादर करताना काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी थेट सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले आहे.
राज्य शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामग्रीसाठी अनुदान दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. सिंचन क्षमता आणि उत्पादनवाढीतही सकारात्मक बदल दिसून येत आहेत. पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणातील शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेतात. यातून तालुक्यात शेतीच्या आधुनिकतेला चालना मिळत आहे.श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी