Purandar Indrayani Rice Price Pudhari
पुणे

Purandar Indrayani Rice Price: पुरंदरचा ‌‘इंद्रायणी‌’ भाव खाणार

दक्षिण पुरंदरमध्ये भात काढणी, झोडणी, मळणी अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

परिंचे : पुरंदर तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ अत्यंत चवदार व सुवासिक असल्यामुळे याला पुणे, मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व हवामानाच्या सततच्या बदलामुळे भातपिकाचे उत्पादन कमी आल्याने इंद्रायणी तांदळाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

काळदरी (ता. पुरंदर) खोऱ्यातील बांदलवाडी, बहिरवाडी, दवणेवाडी, थोपटेवाडी, मांढर, पानवडी, घेरा पानवडी, केतकावळे, देवडी या पट्‌‍ट्यातील भात काढणी, झोडणी, मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. पुरंदर तालुक्याच्या किल्ले पुरंदरभोवती घेरा पुरंदर व दक्षिण पुरंदरमधील काळदरी पट्‌‍ट्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेषत: काळदरी पट्‌‍ट्यात इंद्रायणी भाताची मोठ्या प्रमाणात लागवड होते. पावसाला विलंब झाल्याने रोपे टाकणे आणि लागवडीलाही विलंब झाला. भात काढण्याच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने तसेच भात मोहरत असताना पावसाची संततधार राहिली, त्यामुळे मोहराची गळ झाल्याने दाणे भरण्यावर विपरीत परिणाम झाला. या सर्वांचा परिणाम म्हणून भाताचे उत्पादन कमी निघाले आहे. या भागातील बहुतांश शेतकरी इंद्रायणी भात पिकावरच अवलंबून असतात, त्यांना यामुळे आर्थिक तोटा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. इंद्रायणी तांदळाला गेल्या वर्षापेक्षा जास्त भाव मिळणार असला तरी उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे मिळणारे चार पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग नाराज आहे.

पुरंदर तालुक्यातील इंद्रायणी तांदळाची चव आणि सुवास, यामुळे हा तांदूळ सर्वदूर जात असतो. गेल्या वर्षी 48 ते 50 रुपये किलोचा इंद्रायणीचा तांदूळ यावर्षी 60 ते 65 रुपयांपर्यंत जाणार आहे. यंदा उत्पादन कमी झाले आहे. आमचे दरवर्षीचे इंद्रायणी तांदळाचे कायम ग््रााहक असतात ते घरी येऊन वर्षभराचा तांदूळ घेऊन जातात. परंतु, यावर्षी उत्पादन कमी निघाल्यामुळे अनेक ग्राहकांना इंद्रायणी तांदूळ कमी प्रमाणात मिळणार आहे.
रामदास पापळ, मांढर येथील भात उत्पादक शेतकरी
काळदरी पट्‌‍ट्यात इंद्रायणी तांदळाबरोबरच इंडम, कोलम असे विविध तांदळांचे उत्पादन घेतले जाते. या भागातील इंद्रायणी तांदळाला पुणे जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणात मागणी असते. भात काढणीच्या वेळेसच अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे उत्पादन कमी झाले असले, तरी बाजारभाव मात्र खूप चांगला मिळणार आहे.
संदीप कदम, उप कृषी अधिकारी, पुरंदर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT