Gas Shortage Pudhari
पुणे

Purandar Gas Black Marketing: पुरंदरमध्ये गॅस काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाची धडक मोहीम

इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सींच्या साठ्यांची तपासणी; घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर आढळल्यास कडक कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सासवड: इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन व गॅसपुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात प्रशासन सतर्क झाले आहे. गॅसचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी पुरंदर प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पुरवठा विभागाच्या वतीने तालुक्यातील विविध गॅस वितरकांच्या साठ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. गॅस एजन्सींना वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणीदरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर हॉटेल, ढाबे किंवा इतर व्यावसायिक कारणांसाठी होताना आढळल्यास संबंधित सिलिंडर जप्त करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच अशा प्रकारच्या अवैध साठेबाजीवर मजीवनावश्यक वस्तू कायदाफ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले की, सध्या तालुक्यात गॅस किंवा इंधन टंचाईची कोणतीही स्थिती नाही. मात्र, खबरदारी म्हणून हॉटेल्स, ढाबे, चहाची दुकाने व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना घरगुती सिलिंडरचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.

पुरवठा अधिकारी गोपाळ ठाकरे म्हणाले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, व्यावसायिकांनी घरगुती गॅसचा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, गॅसचा काळाबाजार किंवा अवैध वापर आढळल्यास नागरिकांनी तत्काळ स्थानिक तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इराणमधील तणावामुळे गॅस वाहतूक मार्गांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य टंचाई निर्माण होऊ नये आणि साठेबाजीला आळा बसावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही पथके कार्यरत आहेत. ही पथके हॉटेल, ढाबे, उद्योग, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या तसेच व्यावसायिक आस्थापनांवर अचानक तपासणी करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT