Agriculture News Pudhari
पुणे

Crop Insurance: दोन हजार शेतकऱ्यांना ५ कोटींचा पीक विमा; पुरंदरच्या कांदा उत्पादकांना दिलासा

अतिवृष्टीतील नुकसानभरपाई खात्यात जमा

पुढारी वृत्तसेवा

सासवड: खरीप २०२५ हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुरंदर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील २ हजार ६६ शेतकऱ्यांसाठी तब्बल ५ कोटी ९ लाख ५६ हजार ६४ रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी माहिती दिली.

अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत दावे दाखल केले होते. त्यानुसार झालेल्या पाहणीनंतर विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. या योजनेत प्रतिहेक्टर ५३ हजार रुपये इतकी भरपाई देण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

या भरपाईचा लाभ पुरंदर तालुक्यातील ८० गावांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. कांदा लागवड करणाऱ्या उत्पादकांसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.

विशेषतः सलग नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या विमा भरपाईमुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १६१ हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकासाठी ही नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. तालुक्यातील नायगाव, पिंपरी, माळशिरस, राख, राजुरी, रिसे, नाझरे सुपे, टेकवडी, शिवरी आदी गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत.

गावनिहाय लाभार्थी शेतकरी (निवडक)

नायगाव (१५५), पिंपरी (१५०), माळशिरस (१३८), राख (१२१), राजुरी (११६), रिसे (८५), नाझरे सुपे (८३), टेकवडी (८२), शिवरी (७२) (तसेच इतर गावे).

संकटकाळात मदत

कृषी क्षेत्रातील वाढत्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ वेळेत मिळणे ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. भविष्यातही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक फटक्यापासून संरक्षणासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT