

वाल्हे: पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले, तरी पुरंदर तालुक्यावर दुष्काळाचे सावट कायम आहे. जुलैअखेरीसही अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील १० गावांसह वाड्या-वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाची तहान भागविण्यासाठी शासकीय १० टँकरच्या माध्यमातून दररोज ३१ खेपा सुरू आहेत.
यंदा मान्सूनचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनासाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
सध्या पुरंदर तालुक्यातील १० गावठाणे तसेच वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फेही डिसेंबर महिन्यापासून दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पुरंदर पंचायत समितीने दिली.
पिसे, वागदावाडी, राख, राजुरी, वाल्हे, सोनोरी, दौंडज, झेंडेवाडी, टेकवडी आणि नायगाव या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर दररोज १० टँकरच्या माध्यमातून ३१ खेपा सुरू आहेत. अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.
त्यामुळे भूजलपातळीत वाढ झालेली नसून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू ठेवावे लागत आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींशी चर्चा करून टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पुरंदर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वैभव ढोक यांनी सांगितले.