अमृत भांडवलकर
सासवड: आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा होताच पुरंदर तालुक्यात अनधिकृत प्लॉटिंगचे पेव फुटले. यात गावोगावी कायद्यातील पळवाटा शोधत सात-बारावर नोंदी करून अशा प्लॉटिंगचे प्रकार वाढले आहेत. तसेच, नैसर्गिक ओढे व पाण्याचे स्रोत बुजवून प्लॉट विक्री केली जात असल्याचेही समोर येत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पर्यावरणासह सामान्य गुंतवणूकदारांनाही मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुरंदरमध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोषणेनंतर तालुक्यात जमिनींच्या व्यवहारांना वेग आला. त्याचा फायदा घेत काही बिल्डर व भू-माफियांनी शेतजमिनींचे बेकायदेशीर तुकडे करून गुंठेवारी प्लॉट तयार करण्याचा उद्योग सुरू केला. या प्रक्रियेत महसूल यंत्रणेतील काही घटकांच्या संगनमताने सात-बारावर नोंदी होत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.
सासवड, जेजुरी तसेच बनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, दिवे, झेंडेवाडी, काळेवाडी, सोनोरी, वाघापूर, बोपगाव, भिवरी, सुपे, हिवरे, चांबळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी-विक्री झाली आहे. मात्र, प्लॉट विकसित करताना आवश्यक रस्ते, जलनिस्सारण, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, काही प्रभावशाली घटकांच्या सहभागामुळे या प्रकरणांवर कारवाईचा वेग मंदावल्याची भावना व्यक्त होत आहे.
तसेच एजंटांकडून शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेतला गेला. कमी दरात जमीन खरेदी करून त्याच जमिनींचे प्लॉट करून मोठ्या किमतीत विक्री केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा व्यवहारांमध्ये गुंतवणूक करताना नागरिकांनी 7/12 उतारा, मालकी हक्क, झोनिंग आणि टाऊन प्लॅनिंग मंजुरी यांची खात्री करणे आवश्यक आहे. प्रशासनानेही कठोर कारवाईसह जनजागृती वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
विमानतळ प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय प्रलंबित असताना, अनधिकृत प्लॉटिंग आणि नैसर्गिक स्रोतांचे नुकसान हा गंभीर प्रश्न बनला आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास पर्यावरणीय हानीबरोबरच नागरिकांच्या फसवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे.