पुरंदर विमानतळासाठी 94% शेतकऱ्यांची संमती Pudhari
पुणे

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी 94% शेतकऱ्यांची संमती उद्यापासून जमीन मोजणीला सुरुवात; ऑक्टोबरअखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी जमीन मोजणीला उद्या शुक्रवारपासून (दि.26 सप्टेंबर) सुरुवात करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 94 टक्के शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला संमती दिली आहे. संमतिपत्रे 25 सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार आहेत. विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. (Latest Pune News)

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये हे विमानतळ उभारले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचे समुपदेशन करून जमीन देण्यास त्यांची संमती घेण्याची प्रक्रिया 25 ऑगस्टपासून सुरू केली होती. 18 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

गेल्या महिनाभरापासून भूसंपादन समन्वयक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी सासवड येथे तळ ठोकून संमती मिळविण्याच्या प्रक्रियेला गती दिली. 2900 एकर जमीन उपलब्ध विमानतळ प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी 2700 एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास संमती दिली आहे. तसेच, सातही गावांमध्ये सरकारच्या मालकीची सुमारे दोनशे एकर जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे सुमारे 2900 एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे.

भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार

जमीन मोजणी झाल्यानंतर जमिनीचा दर निश्चित करून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदला आणि परताव्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्यानंतर थेट भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, पुरंदर विमानतळासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर शुक्रवारपासून मोजणीची प्रक्रिया सुरू करणार आहोत. त्यानंतर जमिनीची दरनिश्चिती करून परताव्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर संमती दिलेल्या जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT