

Pune Seth hirachand nemchand Smarak trust hostel facts
पुणे : पुण्यातील मॉडल कॉलनीतील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या जागेवरील वसतीगृहाबाबत चकोर गांधी आणि ट्रस्टींनी स्पष्टीकरण दिले आहे. वसतिगृहाची जागा खासगी विकासकाला देणं अयोग्य असल्याच्या वृत्तांवर भूमिका स्पष्ट करतानाच अशा व्हायरल झालेल्या पोस्ट अथवा बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहनही ट्रस्टने केले आहे.
दिगंबर जैन समाजात मी कार्य केले असून आज मी पुण्यातील ट्रस्टच्या वसतिगृहाबाबत सत्य तुम्हा सर्वांसमोर मांडू इच्छितो असे सांगत चकोर गांधी पुढे म्हणाले, जैन समाजाची मुलं जी पुण्यात शिकायला येतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी 1962- 63 च्या सुमारास हे वसतिगृह बांधण्यात आले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत एकाच कुटुंबाचे सदस्य या ट्रस्टचे अध्यक्ष होते. याशिवाय आमच्या तीन पिढ्यांनी ट्रस्टमध्ये काम केले आहे. मी देखील या ट्रस्टमध्ये 45 वर्षांपासून काम करतोय. या वसतिगृहात राहून गेलेली विद्यार्थी आज करिअरमध्ये यशस्वी आहेत. या ट्रस्टमध्ये कोणाच्याही देणगी नाहीत. या ट्रस्टचा समाजाला फायदा झाला असली तरी ही जागा समाजाची नाही. हे कार्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचं आहे.
वसतिगृहाची इमारत 62- 65 वर्षांची असून इमारतीची अवस्था बिकट आहे. यासाठीच इमारतीच्या पुनर्विकासाची चर्चा सुरू होती. यात मंदिर तसंच ठेवून वसतिगृह नव्याने बांधले जाणार आहे. यात जागतिक दर्जाचे वसतिगृह असेल, असं चकोर गांधींनी सांगितले. पुणे आणि उपनगर असा विकास होतोय. त्यामुळे आणखी दोन- तीन वसतिगृहाची आवश्यकता आहे. ट्रस्टकडे येणाऱ्या पैशांचा वापर यासाठी केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सध्या वसतिगृहाबाबत सोशल मीडियावर काही चुकीच्या गोष्टी व्हायरल होत आहे. या संस्थेबाबत ज्या गोष्टी व्हायरल होत आहे त्यात कोणतेही तथ्य नाही. यातून विनाकारण गैरसमज निर्माण केले जात आहे. वसतिगृहाच्या विश्वस्त मंडळाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले निवासस्थान उपलब्ध व्हावे यासाठी पुनर्विकासाचा निर्णय घेतला. यात विश्वस्तांनी वसतिगृह आणि मंदिर आहे त्याच जागी राहिल याची काळजी घेतली आहे. विश्वस्तांनी वारंवार समाजासमोर वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. 11 जानेवारी 2025 रोजी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आणि एप्रिलमधील महावीर जयंतीलाही याची माहिती देण्यात आली होती. ही स्पष्ट परिस्थिती असतानाही समाजात संस्थेची नाहक बदनामी करण्याचा तर प्रयत्न नाही ना याचा विचार सर्वांनी करावा. व्हायरल बातमीवर विश्वास ठेवू नका अशी विनंती मी सर्वांना करत आहे.
सुरेंद्र गांधी, अधीक्षक, वसतिगृह
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने काय म्हटले आहे?
1. ट्रस्टची स्थापना सन 1958 मध्ये शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय, धर्मशाळा, आरोग्यवर्धक केंद्र, गरीबांसाठी वैद्यकीय सहाय्य आणि इतर परोपकारी उद्देशांच्या प्रगतीसाठी करण्यात आली.
2. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने सदर मालमत्ता 29.07.1958 रोजीच्या विक्री करारनाम्याद्वारे विकत घेतली असून त्या मालमत्तेचा तो पूर्ण मालक आहे.
3. ही मालमत्ता कोणत्याही बाहेरील व्यक्तीने ट्रस्टला दान केलेली नाही किंवा ती ट्रस्टने परोपकारी उद्देशाने विकत घेतलेली आहे.
4. ट्रस्टने सुमारे 60 वर्षांपूर्वी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची इमारत बांधली होती. इमारत जुनी झाल्यामुळे संपूर्ण जमिन विकण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला. त्यासाठी 16-12-2024 रोजी विश्वस्त मंडळाची बैठक बोलावण्यात आली व सदर मालमत्तेच्या संभाव्य विक्रीवर चर्चा झाली.
5. सार्वजनिक सूचना 20-12-2024 रोजी ‘बिझनेस स्टॅंडर्ड’ (इंग्रजी, मुंबई), ‘दैनिक पुढारी’ (मराठी, मुंबई), ‘फायनान्शियल एक्सप्रेस’ (इंग्रजी, पुणे) आणि ‘दैनिक प्रभात’ (मराठी, पुणे) या वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आली.
6. गोखले लँडमार्कस् एल. एल. पी. ने सर्वाधिक बोली लावत रोख स्वरूपात तसेच बांधकामाच्या स्वरूपात सर्वोत्तम ऑफर दिली.
7. ट्रस्टने बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्टच्या कलम 36 अंतर्गत मुंबई येथील चॅरिटी कमिशनरांकडे अर्ज दाखल केला. न्यायालयाने ठराविक अटींसह अर्ज मंजूर केला. ट्रस्टने योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून सदर मालमत्ता गोखले लॅंडमार्कस् एल. एल. पी. कडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
8. मा. चॅरिटी कमिशनर, मुंबई यांनी अर्ज क्र. CC/24/2025 वर दिनांक 04.04.2025 रोजी आदेश देऊन ट्रस्टला मालमत्ता विक्रीस परवानगी दिली आहे.
9. सदर मालमत्तेवर आधुनिक सुविधा असलेले नवीन वसतिगृह बांधण्यात येणार आहे.
10. काही स्वार्थी मंडळी गोखले लॅंडमार्कस् एल. एल. पी. ची बदनामी करण्यासाठी जमीन बळकावण्याच्या अफवा पसरवत आहेत.
11. जैन मंदिर जसे आहे तसे कायम ठेवले जाणार आहे. वसतिगृह आणि जैन मंदिरासाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची सोय केली जाणार आहे.