पुणे : विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात कोठेही घरे, व उंच इमारती होणार नाहीत. जागेची खरेदी-विक्री होणार नाही, याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेऊ, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे स्पष्ट केली. (Latest Pune News)
पुरंदर विमानतळाच्या 90 टक्के जागेचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. विमानतळाच्या शेजारी अनेक जागांची विक्री होत असून भविष्यात या ठिकाणी उंच इमारती उभारल्या जातील अशी शक्यता पत्रकारांनी व्यक्त केल्यानंतर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 51 टक्के मते घेऊन महायुती विजयी होईल. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासाची कामे केली जातील, हा विश्वास राज्यातील जनतेला आहे. महायुती 51 टक्क्यावर आहे, हे विरोधकांचे सर्वे सांगत आहेत. त्यामुळे हारलेल्या मानसिकतेतून ते स्टंटबाजी करत निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत.
बावनकुळे म्हणाले, बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम ठेवणे, समन्वय साधने, शेतकरी पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी परीश्रम घेणे यांसह संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, प्रकल्प थांबले तरी चालतील पण दिवाळीत शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. यासाठी महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी साडेएकतीस हजार कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. हा पीक विमा नाही. त्यामुळे विरोधक जे आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत. उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद समजलेच नाही. ते विधानसभेत केवळ दोन वेळा, मंत्रालयात दोन वेळा आले. उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंतचे सर्वात हतबल मुख्यमंत्री ठरले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले, त्यामुळे इम्तियाज जलिल त्यांना साथ देणारच, अशी टीका देखील बावनकुळे यांनी या वेळी केली.
गुंड नीलेश घायवळला शस्त्र परवाना कुणी दिला या प्रश्नावर उत्तर देतांना बावनकुळे म्हणाले, गुंड नीलेश घायवळला शस्त्र परवाना कुणाच्या सरकारने दिला? पासपोर्टची शिफारस करताना गुन्हे नाहीत, असे कोणाच्या सरकारच्या काळात सांगण्यात आले? हे सर्व पोलिस तपासामध्ये समोर येणार असून या बाबत पोलिस उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना जेरबंद करतील. राम शिंदे व घायवळ यांच्या संबंधाबद्दल शिंदे यांनाच विचारावे लागेल, असे म्हणत बावनकुळे यांनी जोपर्यंत न्यायालय शिक्षा देत नाही, तोवर गुन्हेगार कसे समजायचे? असे पत्रकारांना उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले, त्यामुळे इम्तियाज जलिल त्यांना साथ देणारच, अशी टीका देखील बावनकुळे यांनी या वेळी केली.