पुणे

दौंड तालुक्यात रिचवला जातोय पुण्याचा कचरा..

Laxman Dhenge

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील कचर्‍याची विल्हेवाट दौंड तालुक्यात लावण्याचा सपाटा पुणे महापालिकेच्या कचरा ठेकेदाराने लावला आहे. दौंड तालुक्यातील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या नारायण महाराज बेट परिसरासह अंजीरासाठी प्रसिद्ध असलेल्या खोर गावात आणि नजीकच्या भांडगाव, तांबेवाडी, पडवी, सहजपूर, कासुर्डी या गावात दिवसाकाठी जवळपास दहाहून अधिक हायवा ट्रक हा कचरा रिचवला जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची सोय दौंड तालुक्यात करण्यात आलेली आहे का? असा प्रश्न यामुळे पडला आहे. हा सर्व प्रकार शेतकर्‍याला सेंद्रीय खत देतोय या गोंडस नावाने सुरू असला तरी काही अपवाद वगळता पालिका कचरा ठेकेदाराने कमिशनवर नेमलेले स्थानिक दलाला शेतकर्‍यांच्या नावाखाली हा कचरा रिचवत आहेत. पालिकेच्या कचर्‍याचे निर्मूलन यामुळे होऊन ठेकेदाराची सुटका होईल. मात्र, दौंड तालुक्यातील काही गावे पुण्याच्या कचर्‍याचे माहेरघर बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पुणे शहरातील कचरा, घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अनेक वर्षे वादाचा विषय ठरला आहे. कचर्‍याचे निर्मूलन करण्यासाठी ठेकेदारी पद्धत पुढे आली. ठेकेदाराने कचर्‍याचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे यासाठी ठेका देतानाच कचरा निर्मूलन विषयावर पालिकेकडे तक्रार यायला नको अशी तंबी दिलेली असते, असे समजते यामुळे ठेकेदाराने कचरा उचलून निर्मूलन करण्याची नामी युक्ती शोधलेली आहे. ग्रामीण भागात कचरा खत म्हणून पाठवण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

दौंड तालुका या ठेकेदाराचे सावज झाला असून रोज तालुक्यात कमीत कमी दहा गाड्या हायवा, आणि जास्तीत जास्त 20 गाड्या येऊन खाली केल्या जात आहेत. अतिशय उग्र दुर्गंधी असलेली घाण या गाड्यातून पुणे- सोलापूर महामार्गाने जवळपास 30 किलोमीटर अंतर पार करून येत आहेत. महामार्गावरून जाणार्‍या वाहनांनाही याचा प्रचंड त्रास होतो आहे. दौंड तालुक्यातील काही गावांना हा त्रास सुरू झाला आहे. त्रास झालेल्यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास ठेकेदाराचे दलाल गावात भांडणाचा विषय करत आहेत. कचर्‍याचा त्रास वरून भांडण यामुळे कोणी तक्रारसुद्धा करत नाही. तालुक्यात अशाच पद्धतीने शेकडो टन कचरा खाली होईल, याचा परिणाम नागरी जीवनावर होणार आहे. उग्र वासाने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, याला गांभीर्याने घेणे गरजचे असले तरी स्थानिक ग्रामपंचायती अजून झोपलेल्या आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT