नायलॉन मांजाचा सुळसुळाट : घातक मांजाच्या विक्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

नायलॉन मांजाचा सुळसुळाट : घातक मांजाच्या विक्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उच्च न्यायालयाने व हरित लवादाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचा शहरात सुळसुळाट असून नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. पतंग उडवण्यासाठी  वापरलेल्या नायलॉनच्या मांजामुळे शनिवारी सातारा रस्त्यावरील सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाण पुलावर एक जण गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, या पुलाच्या परिसरात आठवडाभरात तीन घटना घडल्याने नायलॉन मांजाबाबत प्रशासन गांभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मकरसंक्रांत सणाच्या काळात इमारतींच्या गच्च्या, मैदाने, मोकळ्या जागा व रस्त्यांच्या कडेला पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. या पतंगासाठी नायलॉनचा मांजा (दोरी) वापरल्याने प्राणी, पक्ष्यांसह माणसांना गंभीर दुखापती होतात. अनेकांना या मांजामुळे आपला जीवही गमावावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय आणि हरित लवादाने 2021 पासून नायलॉन मांजाच्या विक्रीवर व वापरावर बंदी घातली आहे. या बंदीमुळे पूर्वी चीनमधून आयात होणार्‍या मांजाची विक्री थांबवण्यात आली. आता मात्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये उत्पादन होत असलेला मांजा राज्यात व शहरात येतो. त्यामुळे मांजापासून निर्माण होणारा धोका थांबलेला नाही. त्यामुळे दरवर्षी मांजामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
नायलॉन मांजावर बंदी असल्याने कोणीही व्यावसायिक उघडपणे त्याची विक्री करत नाहीत. पतंग विक्रेत्यांकडे विचारणा केल्यानंतर नायलॉन मांजावर बंदी असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे निदर्शनास येते. एका बाजूला पतंग उडवण्याचा आनंद लुटला जात असताना हेच पतंग नागरिकांसह पक्ष्यांच्या जीवावर बेतत आहेत. कात्रजकडून स्वारगेटच्या दिशेने येणारा 45 वर्षीय दुचाकीस्वार शनिवारी सद्गुरु श्री शंकर महाराज उड्डाणपुलावर नायलॉनचा मांजा गळ्याला अडकल्याने गंभीर जखमी झाला. अचानक गळ्याला मांजा लागल्याने ते दुचाकीवरून खाली कोसळले. मांजामुळे 10 ते 12 सेंटीमीटर लांब व अर्धा सेंटीमीटर खोल जखम होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने पुणे महापालिकेच्या शिवशंकर पोटे दवाखान्यात दाखल करून योग्य मलमपट्टी व उपचार करण्यात आले.

आठवडाभरात तिसरी घटना

शंकर महाराज उड्डाणपुलाच्या कात्रजकडील बाजून मागील आठवड्यात मांजामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यातील एका घटनेत दुचारीस्वाराच्या भुवया कापल्या गेल्या. त्यानंतर याच पुलाच्या परिसरात शनिवारी तिसरी घटना घडली. यावरून नायलॉन मांजासंदर्भात प्रशासन आणि पतंग उडवणारेही गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.

कारवाई करायची कोणी?

न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर व पतंगासाठी वापरावर बंदी घातली असली तरी विक्री करणार्‍यांवर कारवाई कोण करणार, हा प्रश्न आहे. अशा मांजाची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची जबाबदारी आपली नाही, असे म्हणत महापालिका व पोलिस प्रशासन हात वर करत आहे.
एका महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अर्बन सेलने पोलिस व महापालिका आयुक्त यांना यासंदर्भात पत्र देऊन नायलॉन मांजाच्या विक्रीस अटकाव घालण्याची मागणी केली होती. दुर्दैवाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे पुणेकर नागरिक जखमी होत आहेत. प्रशासन पुणेकर नागरिक जखमी व मृत्युमुखी पडायची वाट पाहते का ?
-नितीन कदम, अध्यक्ष, राष्ट्रवादी अर्बन सेल, पुणे शहर. 
मागील काही वर्षापासून पॉलिमर, नायलॉन व काचेचा थर वापरून मांजा तयार केला जात आहे. त्यामुळे मांजा धारदार होऊन बोटे, मान, पाय कापले जातात. मांजामुळे जखमी झालेले प्राणी, पक्षी आणि माणसांना आम्ही निःशुल्क सेवा देतो. तसेच याबाबत आम्ही जनजागृती करून मांजा हटाओ, जान बचाओ अभियान राबवले जाते. गेल्या सात दिवसांत शहरात 50 ते 52 घटना घडल्या आहेत. मांजापासून वाचण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना गळ्याला मफलर बांधावा.
– डॉ. कल्याण गंगवाल, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान, पुणे. 

हेही वाचा

Back to top button