पुणे : पुणे महानगरपालिकेने मिळकतकर थकवणाऱ्या करबुडव्यांसाठी आणलेल्या अभय योजनेमुळे प्रामाणिक करदात्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, नियमित वेळेवर कर भरणाऱ्यांना किमान 25 टक्के सवलत देण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेत्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले की, महापालिका करबुडव्यांना 75 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे आणि त्यांचे स्वागतही करत आहे; मात्र वर्षानुवर्षे वेळेवर कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांना दोन टक्क्यांपलीकडे कोणताही लाभ दिला जात नाही, हा अन्याय आहे. शहराच्या विकासासाठी नियमित कर भरणाऱ्या करदात्यांना प्रोत्साहन म्हणून 25 टक्के सवलत देणे आवश्यक आहे. करबुडव्यांना मोठ्या प्रमाणावर सूट दिली जात असताना प्रामाणिक करदात्यांचा मान राखला गेला पाहिजे.
कर आकारणी आणि करसंकलन विभागातील अधिकाऱ्यांना पुणेकरांची भावना आणि संस्कृती समजलेली नाही. करबुडव्यांचे रांगोळी काढून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करणे हे पुण्याच्या संस्कृतीला धरून नाही. हा आदेश कोणी दिला, त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी. ज्या अधिकाऱ्यांनी करबुडव्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, त्यांचे स्वागत बुधवारी पुणेकरांच्या पद्धतीने करू. आयुक्त संवेदनशीलपणे काम करत आहेत; परंतु कर आकारणी विभाग त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत आहे. या निर्णयांमुळे प्रामाणिक करदात्यांचा भमनिरास होत आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.