पुणे

ऊर्जानिर्मितीमध्ये पुणेकरांचे ‘सौर’ उड्डाण 293 मेगावॅटवर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महावितरण वीज कंपनीच्या वतीने छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यात आला आहे. त्यानुसार पुणे परिमंडलात सुमारे 293.45 मेगावॅट क्षमतेचे 13 हजार सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक व सोसायटीच्या घरगुती 9 हजार 996 ग्राहकांकडील 82.68 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक साहाय्य देण्यात येते.

त्यात घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे. तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळत आहे. उदा. 3 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा यंत्रणेसाठी सुमारे 1 लाख 24 हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे सुमारे 49 हजार 600 रुपयांचे केंद्रीय आर्थिक साहाय्य मिळेल व संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात सुमारे 74 हजार 400 रुपयांचा खर्च करावा लागेल.तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे.

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमुळे घरगुती वैयक्तिक व सोसायट्यांच्या वीजबिलांच्या खर्चात कपात होऊन त्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे 25 वर्षे लाभ होतो. यासह सौर प्रकल्पाच्या यंत्रणेला लावलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रति युनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे.पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत उच्च व लघुदाबाच्या 9996 घरगुती ग्राहकांकडे 82.68 मेगावॅट, 1648 वाणिज्यिक- 44.60 मेगावॅट, 792 औद्योगिक- 135.86 मेगावॅट आणि इतर 569 ग्राहकांकडे 30.30 मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना देणे ही काळाची गरज आहे. पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आणखी वेग देण्यात आला आहे. सन 2023 मध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महावितरणचे अभियंता, कर्मचारी तसेच एजन्सीजचे कर्मचारी यांना सातत्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. छतावरील सौर प्रकल्प उभारणीसाठी महावितरणशी संबंधित सर्व ग्राहक सेवा तत्परतेने उपलब्ध होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

– राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

हेही वाचा

SCROLL FOR NEXT