Pune Jilha Parishad Pudhari
पुणे

Pune Zilla Parishad Ward Committees: पुणे जिल्हा परिषदेत ७३ प्रभाग समित्या पुन्हा स्थापन; ग्रामीण विकासकामांवर नियमित देखरेख

प्रत्येक तीन महिन्यांनी होणार बैठका; रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास कामांचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व ७३ जिल्हा परिषद गटांमध्ये पुन्हा एकदा प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी संबंधित जिल्हा परिषद गटाच्या सदस्याची निवड केली असून, या समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांवर नियमित देखरेख ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.

प्रभाग समित्यांच्या बैठका दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकांमध्ये संबंधित प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास तसेच अन्य विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

सन २०१७ ते २०२२ या कालावधीत राज्यभर जिल्हा परिषद गटनिहाय प्रभाग समित्या कार्यरत होत्या. मात्र, त्यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने रद्द केल्याने राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये अशा समित्या स्थापन होऊ शकत नाहीत. असे असतानाही पुणे जिल्हा परिषद स्थानिक पातळीवर पुढाकार घेत या समित्या पुन्हा सुरू करीत आहे.

प्रत्येक प्रभाग समितीत संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रभागातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच संबंधित अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून विकासकामांतील अडचणी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न या समित्यांद्वारे केला जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ७३ गट असल्याने जिल्ह्यात ७३ प्रभाग समित्या स्थापन होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT