Robotics Pudhari
पुणे

Pune Zilla Parishad Skill Labs: जिल्हा परिषद शाळांमध्ये 130 कौशल्याधारित प्रयोगशाळा उभारणार

रोबोटिक्स, एआर-व्हीआरसह पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवहाराभिमुख शिक्षणाचा नवा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ग््राामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दरी कमी करून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत पुढे आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या उद्देशाने जि. प. च्या शाळांमध्ये कौशल्याधारित प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक व्यापक आणि व्यवहाराभिमुख होणार आहे. व्यवसाय कौशल्य, रोबोटिक्स, खगोलशास्त्र, सिम्युलेशन, ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) अशा एकूण 130 प्रयोगशाळा जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून शालेय वयातच विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांमध्ये बहुआयामी प्रशिक्षण व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. तसेच कौशल्याधारित प्रयोगशाळांसोबतच तंत्रज्ञानाधारित शिक्षणालाही समान महत्त्व देण्यात आले आहे. रोबोटिक्स, ऑगमेंटेड व व्हर्च्युअल रिॲलिटी, सिम्युलेशन आणि अटल टिंकरिंग यांसारख्या आधुनिक संकल्पनांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. स्किल लॅब, एआर-व्हीआर आणि रोबोटिक्स या प्रत्येक घटकासाठी सव्वाकोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सिम्युलेशन प्रयोगशाळांसाठी पावणेपाच कोटी रुपये, तर अटल टिंकरिंगसाठी सुमारे अडीचकोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. एकूणच या सर्व प्रयोगशाळांसाठी अंदाजे 12 ते 15 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, स्किल लॅब वगळता उर्वरित सर्व प्रयोगशाळा जिल्हा परिषदेच्या निधीतून उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना 13 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण

या उपक्रमांतर्गत ‌’स्किल लॅब‌’च्या माध्यमातून एकूण 13 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल कामे, ब्युटिशियन कोर्स, शिलाई-विणकाम, सुतारकाम, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, दागिने निर्मिती, चित्रकला तसेच इतर रोजगाराभिमुख कौशल्यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

प्रयोगशाळांसाठी करार

जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. व्यवसाय कौशल्य प्रयोगशाळेसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन यांच्याशी करार करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेसाठी सव्वा कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ‌’पुणे मॉडेल स्कूल‌’ प्रकल्पांतर्गत संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी विकसित केलेल्या टूल्सच्या आधारे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच या प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT