Teachers  Pudhari
पुणे

Pune ZP Schools: पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षकांचा ‘बूस्टर’; पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध

५९३ रिक्त पदांपैकी ७३ टक्के पदांसाठी शिक्षक मिळाले; समुपदेशनानंतर रिक्त शाळांमध्ये नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करण्यात आली होती. त्यानंतर उपलब्ध झालेल्या शिक्षकांची तातडीने समुपदेशन प्रक्रिया राबवून त्यांची रिक्त शाळांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.

त्यामुळे शिक्षकांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या शाळांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये उपशिक्षकांची ३६२ पदे रिक्त असून, त्यापैकी २३४ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. तसेच भाषा आणि विज्ञान विषयांच्या पदवीधर शिक्षकांची २३१ पदे रिक्त असून, त्यापैकी २०२ शिक्षक उपलब्ध झाले आहेत.

अशा प्रकारे एकूण ५९३ रिक्त पदांच्या तुलनेत ४३६ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. रिक्त पदांच्या तुलनेत उपलब्ध शिक्षकांचे प्रमाण सुमारे ७३ टक्के आहे. उपलब्ध शिक्षकांचे समुपदेशन करताना शाळांमधील रिक्त पदे, विद्यार्थ्यांची संख्या आणि विषयांची गरज यांचा विचार केला जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांना संबंधित शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येईल.

नियुक्ती मिळाल्यानंतर शिक्षकांनी संबंधित शाळेत तातडीने रुजू व्हावे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर परिणाम होत होता. नवीन शिक्षक उपलब्ध झाल्याने ही कमतरता काही प्रमाणात दूर होऊन विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनाचा लाभ मिळणार आहे.

तसेच भाषा, विज्ञान यांसारख्या विषयांचे अध्यापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT