Pune Jilha Parishad Pudhari
पुणे

Pune Jilha Parishad Elections: पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड; राजकीय घडामोडींना वेग

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी पक्षांमध्ये चर्चा, सदस्यांशी संपर्क आणि गटनेत्यांच्या माध्यमातून उमेदवारांची तयारी जोर धरत आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया जवळ येत असताना पुणे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्याने जिल्हा परिषदेत सध्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

विविध पक्षांतील सदस्यांनी आपापल्या गटनेत्यांच्या माध्यमातून पदासाठी प्रयत्न सुरू केले असून, नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने प्रमुख पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी कोणाला संधी द्यायची, याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. काही तालुक्यांमधील सदस्यांनी आपल्या भागाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे अनेक नावे पोहोचली असून, अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दि. 18 मार्च रोजी पदाधिकारी निवडले जाणार आहेत. जिल्हा परिषदेत काही ठिकाणी लहान गट आणि अपक्ष सदस्यही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून सदस्यांशी संपर्क साधून सत्ता समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यामुळे जिल्हा परिषदेत पुढील काही दिवस राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद कार्यालयात निवड प्रक्रियेबाबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि नियोजन केले जात आहे.

मात्र, प्रशासनाची तयारी सुरू असतानाच राजकीय पातळीवर अध्यक्षपदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. पुढील काही दिवसांत पक्षश्रेष्ठींच्या बैठका होऊन अंतिम उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत सत्तेची खुर्ची कोणाच्या वाट्याला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT