Pune Zilla Parishad Pudhari
पुणे

Pune Zilla Parishad: जिल्हा परिषदेत ‘बँडेड’ गाड्यांची धडाकेबाज एन्ट्री; राजकीय हालचालींना वेग

पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांची शक्तिप्रदर्शनासह हजेरी; प्रशासकीय शांततेनंतर परिसरात चैतन्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक राजवटीमुळे शांत आणि निवांत भासणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात बुधवारी (दि.18) अचानक चैतन्य संचारले. पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत ‌‘बँडेड‌’ आलिशान गाड्यांसह दमदार एन्ट्री केली. त्यामुळे परिसरात एक वेगळाच राजकीय आणि सामाजिक माहोल पाहायला मिळाला.

प्रशासक राजवटीदरम्यान निवडून आलेल्या सदस्यांचे आगमन जवळपास बंदच होते. त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात नेहमीची वर्दळही कमी झाली होती. मात्र, पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने अनेक दिवसांनी सदस्य, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली. विविध कंपन्यांच्या महागड्या गाड्या, त्यांचे ताफे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

काही सदस्यांनी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत जोरदार आगमन केले. गाड्यांवर लावलेले झेंडे, घोषणाबाजी आणि स्वागतासाठी जमलेली गर्दी यामुळे जिल्हा परिषद परिसर गजबजून गेला. यानिमित्ताने अनेकांनी आपली राजकीय ताकद दाखवण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद परिसरात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पदाधिकारी निवडीच्या या प्रक्रियेमुळे आगामी राजकीय समीकरणांची झलकही पाहायला मिळाली. एकूणच, ‌‘बँडेड‌’ गाड्यांच्या आगमनाने जिल्हा परिषदेचा परिसर काही काळासाठी का होईना, पण पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT