पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. 16) पासून सुरू होत आहे. हे अर्ज केवळ ‘ऑफलाईन’ पद्धतीनेच भरता येणार आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांच्या मुख्यालयी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेबरोबरच सुमारे चार वर्षे लांबलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असल्याने अनेक इच्छुकांनी निश्वास सोडला आहे.
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपताच राजकीय नेत्यांना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी लक्ष केंद्रित करावे लागणार असून 5 फेबवारीपर्यंत आता त्यांना उसंत मिळण्याची शक्यता दिसत नाही. प्रचंड संख्येने असलेल्या इच्छुकांच्या गर्दीमुळे उमेदवारीवाटपाचे मोठे आव्हान नेते मंडळींना पेलावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य आणि 146 पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी 5 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. 16)पासून सुरू होईल. 21 जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून, दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. 18 जानेवारी रोजी रविवारची सुटी असल्याने त्या दिवशी उमेदवारीअर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारी अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज व शपथपत्रात संपूर्ण माहिती भरून तो संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा. जिल्ह्यातील 13 तालुक्यांच्या मुख्यालयी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. 22 जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात येणार असून, त्यावर निर्णय घेतला जाईल. वैध ठरलेल्या नामनिर्देशन अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 25 व 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज मागे घेता येणार नाहीत. 27 जानेवारी रोजी दुपारी 3.30 नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 5 फेबुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 7 फेबुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपलब्ध ठिकाणे
1) जुन्नर : पंचायत समिती कार्यालय, जुन्नर
2) आंबेगाव : तहसील कार्यालय, घोडेगाव
3) शिरूर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिरूर
4) खेड : उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड यांचे कार्यालय, वाडा रोड, राजगुरूनगर
5) मावळ : तहसील कार्यालय, वडगाव मावळ
6) मुळशी : तहसील कार्यालय, मुळशी, पौड
7) हवेली : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आंबेगाव बुद्रुक, पुणे
8) दौंड : नवीन प्रशासकीय इमारतर, तहसील कार्यालय, दौंड
9) पुरंदर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, पुरंदर, सासवड,
10) वेल्हे : तहसील कार्यालय, राजगड, वेल्हे बुद्रुक,
11) भोर : तहसील कार्यालय, राजवाडा चौक, भोर
12) बारामती : तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती
13) इंदापूर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, इंदापूर
...असे आहे, सभापतीचे आरक्षण
राजगड : सर्वसाधारण महिला
मुळशी : सर्वसाधारण महिला
भोर : सर्वसाधारण महिला
पुरंदर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
आंबेगाव : सर्वसाधारण
मावळ : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
बारामती : सर्वसाधारण
हवेली : सर्वसाधारण
शिरूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
दौंड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
जुन्नर : अनुसूचित जमाती महिला
खेड : सर्वसाधारण महिला
इंदापूर : अनुसूचित जाती