

पुणे: तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात फेकून पुण्यात येऊन त्याची कार विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी दोघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. भोसरीतील इंद्राणीनगरात राहणाऱ्या मित्राला त्याच्या कारमधून महाबळेश्वरला फिरायला जाऊ असे सांगून ताम्हिणी घाटात गळा आवळून कोयत्याने वार करून त्याचा खून केला. आदित्य गणेश भगत (वय 22,रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. चोबे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. भगतच्या खूनप्रकरणी मानगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अनिकेत महेश वाघमारे (वय 26, रा. रोकडोबा मंदिराजवळ, हिंगणे खुर्द) आणि तुषार ऊर्फ सोन्या शरद पाटोळे (वय 24, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिकेत वाघमारे याच्यावर पर्वती पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. तर त्यांचा साथीदार प्रज्वल ऊर्फ सोन्या संतोष हंबीर (रा. वारजे माळवाडी) याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत बाणेर आणि माणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावाच्या हद्दीतून सिक्रेट पॉईंटकडे जाणाऱ्या रोडच्या उजव्या बाजूला जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी जागा पाहण्यासाठी आलेल्यांना 11 जानेवारी रोजी एका तरुणाचा मृतदेह दिसला होता.
कोयत्याने तरुणाच्या गळ्यावर, डोक्यावर व हातावर वार केल्याच्या खुना होत्या. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्याचवेळी पोलिसांचे लक्ष खून झालेल्या तरुणाच्या हातातील इलेक्ट्रॉनिक घड्याळाकडे गेले. त्या घड्याळाच्या साह्याने माणगाव पोलिसांनी काही तासात मृताची ओळख पटविण्यापासून संशयित आरोपींची नावे निष्पन्न केली. अनिकेत वाघमारे, तुषार पाटोळे आणि प्रज्वल हंबीर हे आदित्य भगत याच्या इनोव्हा क्रिस्टा कारमधून महाबळेश्वर येथे फिरायला निघाले होते. ताम्हिणी घाटामध्ये आल्यावर त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला. तिघांनी आदित्य भगत यांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्याच्यावर कोयत्याने डोक्यात, गळ्यावर, हातावर वार करून त्याचा मृतदेह सणसवाडी गावाच्या हद्दीत टाकून ते पुण्याला परत आले, अशी माहिती माणगावचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी दिली.
तर दुसरीकडे आरोपी पुण्यात आल्यानंतर त्यांनी गाडी विकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बाणेर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार प्रितम निकाळजे यांना 11 जानेवारी रोजी बातमी मिळाली की, एक व्यक्ती चोरीची कार विक्री करण्याच्या प्रयत्नात असून तो कार घेऊन ननावरे पुलाजवळ थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारचा दरवाजा उघडून आत बसत असताना एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव अनिकेत वाघमारे असल्याचे सांगितले. त्याच्याकडील कारबाबत चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आणि आपल्या इतर साथीदारांनी मिळून आदित्य भगत याचा खून करुन त्याची गाडी घेऊन पुण्यात आल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना तुषार पाटोळे आणि ओमकार केंबळे (रा. पर्वती) याची नावे सांगितले.
मात्र चौकशीत ओमकार केंबळे याचा या घटनेशी संबंध नसल्याचे नंतर तपासात निप्पन्न झाले. केंबळे याच्याशी पूर्ववैमन्स असल्यामुळे वाघमारे याने त्याचे नाव या प्रकरणात घेतले होते. वाघमारे आणि पाटोळे या दोघांना पुढील कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक अलका सरग यांच्यासह सपोनि कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलिस अंमलदार गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे यांनी केली.