Pune Jilha Parishad Pudhari
पुणे

Pune Zilla Parishad Security: पुणे जिल्हा परिषदेत प्रवेशाला नवी नियमावली; सदस्यांना विशेष बॅज, सुरक्षाही कडक

सभागृहातील आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर प्रशासनाचा निर्णय; सर्वसाधारण सभेवेळी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहातील प्रवेशासाठी सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन सदस्यांची ओळख सहज व्हावी, यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना विशेष बॅज देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी दिली.

सर्वसाधारण सभेच्या वेळी सभागृहाबाहेर विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेची सुरक्षा यंत्रणाही कार्यरत राहणार आहे. २७ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकाने तिच्या हातातील पेट्रोलची बाटली वेळीच हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता. या महिलेने जि. प. सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

या घटनेनंतर जि. प. सभागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रवेशव्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे.

यापूर्वी सभापतींना दिले होते बॅज

पुणे जिल्हा परिषदेत या वेळी अनेक सदस्य प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख नसल्याने सभागृहात प्रवेश देताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी सदस्यांना विशेष ओळखपत्रासोबत बॅज देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सभापतींची ओळख पटावी, यासाठी बॅज दिले आहेत. आता जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांनाही बॅज देण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT