पुणे: आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ‘महाआरोग्य सन्मान 2026’अंतर्गत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
‘आरोग्याचा ध्यास- महाराष्ट्राचा विकास’ या संकल्पनेअंतर्गत राबवलेल्या लोकाभिमुख योजना, उपक्रम आणि प्रभावी अंमलबजावणीबद्दल पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली. राज्यात ‘महाराष्ट्र पॅलेटिव्ह केअर कार्यक्रम’ व ‘मेनोपॉज क्लिनिक’च्या राज्यस्तरीय लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
जि.प.चे सीईओ गजानन पाटील आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबवले. ‘भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची’ या ध्येयवाक्याखाली आळंदी-देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान आरोग्य सेवेचे प्रभावी नियोजन व नियंत्रण केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
एबीडीएम ‘ई-सुश्रुत’ प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने, डॉ. इंदिरा पारखे आणि डॉ. मिलिंद दौंडकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल शोभा सोनबा खेडकर, गट प्रवर्तक आशा सुर्वे आणि जिल्हा समूह संघटक आशा कीर्ती तागड यांचाही गौरव करण्यात आला.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेतली गेल्याचे स्पष्ट झाले असून, ग््राामीण भागातील आरोग्यसेवांना नवे बळ मिळणार असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.