पुणे: जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यनिवडीत यंदा एक वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. एकूण 83 जागांसाठी 80 सदस्य पात्र असल्याने तीन सदस्यांना एकाच वेळी दोन समित्यांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हे तीन सदस्य ‘लकी’ ठरणार असून, त्यांना दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेत एकूण 10 विषय समित्या कार्यरत आहेत. यामध्ये समाजकल्याण समितीत सर्वाधिक 11 सदस्य संख्या आहे, तर जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीत सर्वांत कमी केवळ 6 सदस्य असतात. कृषी समितीत 10 सदस्य असून, स्थायी समितीसह अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण समित्यांमध्ये प्रत्येकी 8 सदस्यांचा समावेश असतो.
जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी तसेच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सभापती असतात. या दोन्ही समित्यांवर उपाध्यक्ष आणि चार विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य म्हणून कार्यरत असतात. उपाध्यक्ष हे अर्थ व नियोजन आणि शिक्षण समितीचे सभापती असतात. याशिवाय बांधकाम समितीचे सभापती हे बांधकाम व आरोग्य, तर कृषी समितीचे सभापती हे कृषी आणि पशुसंवर्धन या दोन समित्यांचे सभापती म्हणून काम पाहतात.
समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समित्यांचे सभापती हे आपल्या संबंधित समित्यांचे प्रमुख असतात. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती हे मिळून सहा पदाधिकारी पदसिद्ध सदस्य म्हणून काही समित्यांवर कार्यरत असल्याने त्यांना इतर समित्यांच्या सदस्य निवडणुकीत उमेदवारी देता येत नाही. एकूणच, सदस्य संख्येतील या तफावतीमुळे यंदा तीन सदस्यांना दुहेरी संधी मिळणार असून, जिल्हा परिषदेच्या कामकाजात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
समितीनिहाय अशी आहे सदस्यसंख्या
समितीनिहाय पाहता स्थायी समितीत 13 पैकी 5 पदसिद्ध सदस्य आहेत, तर जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीत
15 पैकी 9 पदसिद्ध सदस्य (पाच पदाधिकारी व चार अधिकारी) आहेत. उर्वरित समित्यांमध्ये वित्त व नियोजन, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण समितीत प्रत्येकी
8 सदस्य, कृषी समितीत 10 व समाजकल्याण समितीत 11 सदस्यांचा समावेश आहे.