पुणे: लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी, पेठांमधील वाडे, मंडईतील विक्रेत्यांची धावपळ अन् कॅम्पमधील बदलती जीवनशैली... रोजच्या जगण्यातले असे असंख्य क्षण आता तरुणाईच्या कॅमेऱ्यात कैद होत आहेत. कारण आता तरुणाईमध्ये स्ट्रीट छायाचित्रणाची क्रेझ वाढली आहे. छायाचित्रणाची पारंपरिक चौकट बदलत असून, पोर्ट्रेट, निसर्ग किंवा वन्यजीव छायाचित्रणासह आता सामान्य माणसाचे दैनंदिन जगणे टिपण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. त्यामुळे ‘स्ट्रीट छायाचित्रण’ हा नव्या पिढीचा आवडता ट्रेंड ठरत आहे.
बुधवारी (दि.१९) साजऱ्या होणाऱ्या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने याविषयी काही छायाचित्रकारांशी संवाद साधला. विशेषतः १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी रस्त्यांवरील घडामोडी, माणसे आणि अनपेक्षित क्षण टिपत आहेत. त्यात स्ट्रीट छायाचित्रणाचे जग खासकरून जेन झींना खुणावू लागले आहे. रस्त्यावर अचानक घडलेला एखादा प्रसंग, व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेला भाव, सण-उत्सव... अशा विविध विषयांवरील छायाचित्रे टिपण्याकडे कल आहे. ही छायाचित्रे आणि त्यावर आधारित रील्स इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्ससह सोशल मीडियावर शेअर केली जात असून, त्यांना प्रतिसादही मिळत आहे.
पुण्याच्या जुन्या पेठांपासून मेट्रो, उंच इमारती, आधुनिक कॅफे आणि बदलती जीवनशैली असा शहराचा बदलता चेहरा टिपण्याला प्राधान्य दिले जात आहे. ‘ओल्ड पुणे’, ‘पुण्याच्या पेठा’, ‘पावसाळ्यातील पुणे’, ‘पुण्याच्या बाजारपेठा’ अशा हॅशटॅगद्वारे शहराची वेगळी ओळख मांडली जात आहे. मोबाईल कॅमेऱ्यामुळे या छायाचित्रणाला चालनामिळाली आहे.
पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे म्हणाले, स्ट्रीट छायाचित्रण हे आताच्या घडीला तरुणाईला आवडता ट्रेंड आहे. विशेषतः जेन झीतील अनेक जण मोबाईलवर पुण्यातील रस्त्यांवरील क्षण टिपून सोशल मीडियावर शेअर करतात. काहींसाठी हा करिअरचा पर्यायही ठरत आहे.
सध्या स्ट्रीट छायाचित्रणाचा ट्रेंड आम्हा छायाचित्रकारांमध्ये वाढला आहे. स्ट्रीट छायाचित्रणासाठी निरीक्षणशक्ती, संयम आणि योग्य क्षणी क्लिक करण्याची नजर आवश्यक असते. पुण्याच्या रस्त्यांवरची हीच नजर नव्या पिढीत विकसित होत असून, शहरातील बदलते जीवन, माणसे आणि क्षण कॅमेऱ्यात जपण्याचा हा छंद दिवसेंदिवस विस्तारत आहे.विवेक गाटे, छायाचित्रकार.