Pune Municipal Corporation Corruption: पुणेकरांच्या पैशातून विकासकामे; नेत्यांची मात्र ‘संकल्पना-सौजन्य’ची चमकोगिरी!

करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या कामांवर लोकप्रतिनिधींची नावे; आचारसंहितेत फलक झाकण्यासाठी महापालिकेवर लाखोंचा भुर्दंड
Pune Municipal Corporation Corruption
Pune Municipal Corporation CorruptionPudhari
Published on
Updated on

महेंद्र कांबळे, सुनील कडूसकर, शंकर कवडे, विनय पुराणिक, निनाद देशमुख.

पुणे: सर्वसामान्य पुणेकरांकडून कररूपाने गोळा करण्यात येणाऱ्या पैशाआधारे होणारी विकासकामे वा त्यांची नामकरणे ही आपलीच 'संकल्पना' असल्याचा दावा करून त्यावर आपल्या नावाची मोहोर उमटविणाऱ्या कल्पक मान्यवरांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून आले. महापालिकेच्या वतीने केले जाणारे कापडी पिशव्यांचे वाटप असो, नाही तर नागरिकांसाठी रस्त्याकडेला बसविलेले बेंच वा एखाद्या मैदानात पालिकेच्या खर्चाने बसविलेली खेळणी आणि व्यायामाचे साहित्य असो... या सर्वांवर ठळकपणे कोरले जाते ते कल्पक माननीयांचे नाव. हा सगळा खटाटोप फुकटात मतदारांच्या मनावर आपले नाव ठसविण्यासाठीच. दै. 'पुढारी'च्या टीमने केलेल्या पाहणीत शहराच्या गल्लीबोळात लोकप्रतिनिधींच्या अशा फूकट जाहीरातीचे असंख्य प्रकार समोर आले आहेत.

Pune Municipal Corporation Corruption
Agriculture Department: कृषि विभागाच्या प्रस्तावित नवीन आकृतीबंध रद्द करण्याची मागणी का केली जातेय?

फुकटची चमकोगिरी

जनतेच्या कराच्‍या पैशांतून होणाऱ्या विकासकामांवर स्वतःचे नाव कोरण्याची लोकप्रतिनिधींची हौस हडपसर, हांडेवाडी, उंड्री, सय्यदनगर, कृष्णानगर, ससाणेनगर, काळेपडळ, फुरसुंगी, माळवाडी, पंधरानंबर, मांजरी आणि इतर परिसरात चांगलीच बोकाळली आहे. रस्ते, उद्याने, कमानी, बाकडे, दिशादर्शक आणि सार्वजनिक सुविधांवर 'संकल्पना', 'सौजन्य'च्या नावाखाली स्वतःची नावे झळकवून श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू आहे.

ससाणेनगरकडून हांडेवाडी आणि महंमदवाडी रोडकडे जाणाऱ्या भूमिगत बायपासवर भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग आहे. या ठिकाणी आमदाराने आपल्‍या नावाने भिंती रंगवून संकल्‍पनेला आपले नाव दिले आहे. मात्र, याच मार्गावर तुंबलेली गटारे, दुर्गंधी, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नावाची पाटी लावण्याइतकी तत्परता समस्या सोडविण्यात का नाही? असा सवाल नागरिक उपस्‍थित करीत आहेत. हांडेवाडी रस्‍त्‍यावरील श्रीराम चौकात मूर्तीजवळच माजी नगरसेवकाचे भव्य नाव, तसेच जेएसपीएम कॉलेज येथे वाचनालयाच्‍या येथेही नगरसेवकाच्‍याच नावाची पाटी लावली आहे. हडपसर येथील सार्वजनिक उद्यानांच्या कमानी, गल्लीबोळातील दिशादर्शक आणि इतर सुविधांवरही लोकप्रतिनिधींची नावे झळकत असून, नावे देण्यात यांची चढोओढ सुरू आहे का? असाही प्रश्न पडतो.

निवडणूक आली की पाट्या झाकण्याचा खर्चही जनतेचाच

आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा पाट्यांवरील नावे झाकण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते. म्हणजे विकासकामांचा खर्च जनतेचा आणि नाव झाकण्याचा खर्चही जनतेचाच! प्रसिद्धीची एवढीच हौस असेल, तर नावाच्या पाट्यांचा खर्च स्वतःच्या खिशातून करा, असा संतप्त सूर नागरिकांतून उमटत आहे. हडपसर, हांडेवाडी, उंड्री, सय्यदनगर, कृष्णानगर, ससाणेनगर, काळेपडळ, फुरसुंगी, माळवाडी, पंधरानंबर, मांजरी परिसरातील रस्ते, कचरा, गटारे आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न गंभीर असताना नावाच्या पाट्या मात्र चकाचक दिसत आहेत. त्यामुळे 'जनतेचा पैसा, नेत्यांची प्रसिद्धी' या श्रेयबाजीला महापालिका प्रशासन कधी लगाम घालणार? असा सवाल पुणेकर उपस्‍थित करत आहेत.

Pune Municipal Corporation Corruption
Supriya Sule: ‘आम्ही विरोधी पक्षातच’; एनडीएसोबत जाण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंचा टोला

इथे चालते संकल्पना-सौजन्याची स्पर्धा!

महापालिकेच्या नव्हे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाने झालेल्या विकास कामांवर स्वतःच्या नावाचा कायमचा ठसा उमटवण्याचा विडाच कोथरूडमधील लोकप्रतिनिधींनी उचललेला दिसतो. किंबहूना त्यांच्यात यासाठी स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसते. या स्पर्धेत खासदार, आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी सर्वांचाच सक्रिय सहभाग दिसतो.

कोथरूडकडे जाणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलापासून याची प्रचिती येऊ लागते. या पुलाच्या निर्मितीची संकल्पना माननीयांची आहे की, त्याला स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना नाव देण्याची संकल्पना त्यांची होती, याचा उलगडा मात्र यातून होत नाही. येथून पुढे शिवाजी पुतळा चौकात गेल्यावर एका शाळेच्या नामफलकावर तर त्या समोर कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिराच्या स्वागत कमानीवरही एका माननीयाचे नाव ठळकपणे लक्ष वेधून घेते. कोथरूडच्या भाजी मंडईची इमारत अजून वापरातही आलेली नाही. अक्षरशः कचरा कुंडीचे स्वरूप आलेल्या या बहुमजली भाजी मंडईच्या इमारतीवर माननीयांच्या संकल्पना स्पष्ट नजरेत भरते. त्यापुढे महापालिकेचे दवाखाने आहेत. कोथरूडमधील मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तींची नावे देण्यात आलेल्या या रुग्णालयांच्या कमानींवरही संकल्पनेचा उल्लेख करण्यास पालिका चुकलेली नाही. येथील एका चौकाच्या कोपऱ्यावर सुशोभीकरण करून आय लव्ह कोथरूड असा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. येथे तर एक नव्हे अनेक मान्यवरांची नावे दिसतात. याच रस्त्यावर पुढे रस्ता दुभाजकात भारतीय जवानांचे शिल्प उभारले गेले आहे. त्यावरही संकल्पना ठळकपणे नजरेत भरेल अशा पद्धतीने लावण्यात आली आहे. या खेरीज दिशादर्शक फलक, सोसायट्यांचे लोकेशन सांगणारे फलक, रस्त्यांच्या नामफलकावरही संकल्पना असे लिहून फुकट जाहिरात केलेली दिसते.

Pune Municipal Corporation Corruption
PM Modi Baramati Visit: बारामतीत १६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम? शरद पवारांकडून संकेत

पैसा पालिकेचा; ‘श्रेयवाद’ नेत्यांचा

पुणेकरांच्या करातून महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या पैशातून सार्वजनिक कामे करायची आणि त्यावर मात्र स्वतःचे नाव झळकवायचे, असा प्रकार शहरात सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. रस्त्यालगतच्या भिंती रंगवणे, ऐतिहासिक प्रतिकृती उभारणे, बाकडी बसवणे, स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे अशा प्रत्येक कामातून लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी स्वतःचे श्रेय घेत असल्याने सार्वजनिक निधीचा वापर नेमका कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. या कामांमध्ये भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रा, स्वच्छतेचे संदेश आणि विविध आकर्षक चित्रे साकारण्यात आली आहेत. मात्र, या कलाकृतींसोबतच संबंधित नगरसेवक, आमदार अथवा राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे ठळकपणे झळकत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी महापालिकेच्या रुग्णालयांची नावेही फलकांवर नमूद केली आहेत. कसबा पेठेतील अनेक कचऱ्यांच्या क्रोनिक स्पॉटवर महापालिकेमार्फत सुशोभीकरण करण्यात आले आहे. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हे करण्यात आले आहे. कसबा पेठेत विविध भागांत केलेल्या या सुशोभीकरणाला संकल्पना म्हणून आमदार हेमंत रासने यांचे नाव देण्यात आले आहे. प्रभागात नागरिकांना बसण्यासाठी विविध चौकात बाकडी देण्यात आली आहे. या बाकड्यांना देखील संकल्पना म्हणून आमदार हेमंत रासने आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. तर, सणस मैदानासमोर महापालिकेच्या निधीतून स्व. खासदार गिरीश बापट पेट सिटी अँड डायग्नोसिस सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरला संकल्पना म्हणून भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक धीरज घाटे यांचे व नगरसेवक अमर आवळे यांचे नाव देण्यात आले. महापालिका प्रशासनाने अशा कामांवरील फलक आणि नावांची तपासणी करून सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामांवर वैयक्तिक अथवा पक्षीय श्रेयवादाला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. करदात्यांच्या पैशांतून होणाऱ्या विकासकामांवर एखाद्या व्यक्तीचे नाव नव्हे, तर त्या कामामागील महापालिका आणि नागरिकांचा हक्क दिसला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Pune Municipal Corporation Corruption
Maharashtra Agriculture Admission 2026: कृषी अभ्यासक्रम प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना मिळाले महाविद्यालय

विकासकामांच्या फलकांचे विद्रूपीकरण

नागरिकांच्या करातून होणाऱ्या विकासकामांच्या फलकांवर स्वतःचे नाव, फोटो आणि 'सौजन्य', 'संकल्पना'चा उल्लेख करून श्रेय घेण्याचा लोकप्रतिनिधींचा मोह कायम आहे. महापालिका निवडणूक आचार संहितेदरम्यान अशी नावे असलेल्‍या फलकांवर चिकटपट्ट्या किंवा रंग लावण्यात आला होता. मात्र, निवडणुका संपून आठ महिने उलटले तरी अनेक ठिकाणी, अनेक फलकांवर त्‍या ठिकाणच्‍या लोकप्रतिनिधींच्‍या नावावरील चिकटपट्ट्या कायम आहेत किंवा त्‍या काढल्‍याने तो फलक विद्रूप दिसत आहे. मुळात अशा प्रकारे केलेल्‍या विकासकामांच्‍या फलकावर सौजन्‍य किंवा संकल्‍पना असा उल्‍लेख स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी का केला, असा सवाल नागरिक उपस्‍थित करत आहेत.

शिवाजीनगर परिसरातील एसटी स्टॅण्ड, जंगली महाराज तसेच गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील विकासकामे तसेच स्वारगेट परिसरातील उड्डाणपूल तसेच अनेक विकासकामांच्या फलकांची अशी अवस्था आहे. काही ठिकाणी पट्ट्या अर्धवट निघाल्या आहेत, तर रंगामुळे मूळ मजकूरही खराब झाला आहे. करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या कामांचे वैयक्तिक श्रेय लोकप्रतिनिधींनी का घ्यावे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. फलकांवर लोकप्रतिनिधींची नावे आणि फोटो देण्याऐवजी कामाचे नाव, खर्च, निधीचा स्रोत आणि संबंधित यंत्रणेची माहिती द्यावी. 'सौजन्य' आणि 'संकल्पना'च्या नावाखाली प्रसिद्धी करण्याची पद्धत बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेला लाखोंचा भुर्दंड

निवडणूक आचारसंहिता लागू होताच विकासकामांच्या फलकांवरील लोकप्रतिनिधींची नावे आणि छायाचित्रे झाकण्याची जबाबदारी महापालिकेवर येते. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी फलकांवर नावे लावली जातात; मात्र आचारसंहितेच्या काळात ती झाकण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, चिकटपट्ट्या लावणे, रंगकाम करणे आणि इतर उपायांसाठी महापालिकेला लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो.

महापालिकेची विकासकामे नागरिकांच्या करातून होतात. त्यामुळे फलकावर एखाद्या लोकप्रतिनिधीचे नाव किंवा फोटो लावून त्याचे वैयक्तिक श्रेय घेणे योग्य नाही. फलकावर कामाचा खर्च आणि निधीची माहिती द्यावी. 'सौजन्य' आणि 'संकल्पना'च्या नावाखाली स्वतःची जाहिरात करण्याची पद्धतच बंद झाली पाहिजे.

स्वप्नील जोशी, नागरिक, शिवाजीनगर.

निवडणुकीच्या काळात नावे झाकण्यासाठी लावलेल्या पट्ट्या आणि रंग आजही अनेक फलकांवर आहेत. त्यामुळे फलक अत्यंत विद्रूप दिसतात. महापालिकेने आचारसंहिता संपल्यानंतर ते पूर्ववत करणे अपेक्षित होते. लोकप्रतिनिधींनीही नावाच्या प्रसिद्धीपेक्षा विकासकामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे.

ॲड. मोनिका गावडे-देशमुख, नागरिक, शनिवार पेठ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news