Pune Kidnapping Case Pudhari
पुणे

Pune Kidnapping Case: मैत्रिणीच्या कारणातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; दोघांना बेड्या

याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली. ही घटना बुधवारी (दि.९) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सदाशिव पेठ परिसरात घडली.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आपल्या मैत्रिणीशी का बोलतो, या कारणातून झालेल्या वादात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचे हॉटेल व्यावसायिकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने अपहरण केले. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर आरोपींनी अपहृत तरुणाला अलका चौकात सोडून पळ काढला.

याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली. ही घटना बुधवारी (दि.९) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सदाशिव पेठ परिसरात घडली.

प्रसाद सूर्यवंशी असे अपहृत तरुणाचे नाव आहे. याबाबत हॉटेल व्यावसायिक सागर बोराडे आणि किशोर सावंत या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या इतर साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल केला असून, संबंधित तरुणीला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

प्रसाद आणि संबंधित मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, शनिवार पेठ परिसरातील इमारतीत ते राहतात. त्या तरुणीची सागर बोराडेशीही मैत्री आहे. त्या मुलीशी बोलू नको, असे सांगत सागरने काही दिवसांपूर्वी प्रसादला समज दिली होती.

मात्र, त्यानंतरही दोघांत बोलणे सुरू असल्याचा सागरला संशय होता. गुरुवारी रात्री साडेबारा वाजता सागर व त्याचे साथीदार फॉर्च्युनरमधून प्रसादच्या राहत्या इमारतीजवळ आले. प्रसाद दुचाकीवरून खोलीकडे निघत असतानाच त्याला अडवून शिवीगाळ, मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवले. हा प्रकार प्रसादच्या रूममेटने बघितल्यावर त्याने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

आरोपी प्रसादला सिंहगड रोडने घेऊन गेले. त्याचा मोबाईल काढून घेतला. त्याला मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपी बोराडे हा प्रसादला तुझा आणि त्याच्या मैत्रिणीचा (आरोपी तरुणीचा) काय संबंध असे विचारत होता.

बोराडेने तरुणीला फोन करून तुझे आणि सागरचे प्रेमसंबंध आहेत का, असे विचारले होते. त्या वेळी तरुणीने सांगितले, त्याला सोडू नकोस तो मला त्रास देतो. अजून मारा असे म्हणाली. आरोपींनी प्रसादला पुन्हा मारहाण केली. तुला मारून टाकतो, तुझा कार्यक्रमच करतो, अशी धमकीदेखील दिली.

तब्बल २१ कॉल!

एका पोलिस अधिकाऱ्याने आरोपीला समजावून प्रसादला सोडण्यासाठी तब्बल २१ वेळा फोन केला. मात्र, सागरने एकही कॉल उचलला नाही. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागल्याने आरोपींनी पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने फॉर्च्युनर सोडून दुसरी स्कॉर्पिओ घेतली आणि प्रसादला त्यामध्ये बसवून कात्रजच्या दिशेने निघाले. पोलिसांपासून सुटका होणार नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी यू-टर्न घेतला व प्रसादला अलका चौकात सोडून दिले आणि स्कॉर्पिओमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्कॉर्पिओचा पाठलाग करत पोलिसांनी काही अंतरावरच सागर बोराडे आणि किशोर सावंतला पकडले.

पोलिस आयुक्तांची भेट

अपहृत तरुण प्रसाद आणि त्याच्या मित्रांनी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात अमितेश कुमार यांची भेट घेतली व त्यांना प्रसादसोबत घडलेल्या घटनेची माहिती देऊन सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, याबाबत कठोर कारवाई करण्याचे आश्र्वासन अमितेश कुमार यांनी तरुणांना दिले. तसेच गुन्हे शाखेची पथके त्या परिसरात गस्त घालतील, त्याचबरोबर विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनादेखील विद्यार्थी वास्तव्यास असलेल्या परिसरात लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या.

आरोपी सागर बोराडेचे अलका चौकात हॉटेल आहे. त्याचे इतर तीन साथीदार पुण्यात वेगवेगळी कामे करतात. सागरची मुलीसोबत कशी ओळख झाली, त्यांच्यातील नेमके नाते काय आहे, याचा तपास सुरू आहे. मुलीला नोटीस देऊन जबाबासाठी बोलावले असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
- कृषिकेश रावले, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT