पुणे: भाजीविक्रेत्या तरुणाने आपण पोलिस झाल्याचे सांगून सोसायटीत पेढे वाटले. एवढेच काय तर चौकात अभिनंदनाचा फ्लेक्स देखील लावला. पोलिसांना वाटले कोण आपल्या हद्दीत पोलिस झालाय हे पाहून त्याला अभिनंदनासाठी बोलवावे, पण पोलिसांच्या चौकशीत भलताच प्रकार समोर आला.
प्रत्यक्षात तो पोलिस भरती झाला नसताना त्याने तसे भासवून फ्लेक्स लावले. पोलिस वर्दीतील फोटो काढून मोबाईलमध्ये व्हॉटसअप स्टेटसवर ठेवले. याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेश राजू जाधव (वय 26, रा. तिडके डेअरी, नऱ्हे रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ऋषिकेश जाधव हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलिस व्हायचे होते. पण उंचीमुळे ते काय शक्य झाले नाही. तसेच त्याच्या घरचे लग्नाचा विचार करू लागले होते. त्यामुळे त्याने आपल्या आईला पोलिस झाल्याचे खोटे सांगितले.
सोसायटीमध्ये पोलिस झाल्याबद्दल पेढे देखील वाटले. घराबाहेर फ्लेक्स लावला. त्यात महाराष्ट्र पोलिस दलाचे चिन्ह, आपल्या फोटोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फोटो, खाली ऋषिकेश जाधव यांची पुणे शहर पोलिसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे फ्लेक्सवर लिहिले होते. दोन दिवसांपूर्वी हा फ्लेक्स लावला होता.
पोलिसांनी चौकशी केल्यावर तो सार्वजनिक सेवक अथवा सरकारी नोकर नसताना पोलिसमध्ये भरती झाल्याचे भासविले. पोलिस वर्दीमधील फोटो मोबाईलमध्ये व्हॉटसअप स्टेट्सवर ठेवल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस फौजदार शिंदे तपास करत आहेत.