Yerwada Jail  Pudhari
पुणे

Yerwada Central Jail Mobile Seizure: येरवडा कारागृहात पुन्हा मोबाईलचा सुळसुळाट; विशेष झडतीत ५ फोन जप्त

सुरक्षेला चकवा देत बराकीतून मोबाईल, पॉवर बँक जप्त; कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेला चकवा देऊन आत मोबाईल फोन पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारागृह प्रशासनाने राबविलेल्या एका विशेष झडती मोहिमेत 1, 2 आणि 6 क्रमांकाच्या बराकींच्या परिसरातून तब्बल 5 मोबाईल फोन, 2 पॉवर बँक आणि चार्जिंग वायर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कैद्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कारागृहातील कैदी हे सर्रास मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, येरवडा कारागृहात मोबाईल आढळून येण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी देखील कारागृहात मोबाईल आढळून आले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत अंतर्गत सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेमुळे काही प्रमाणात लगाम लागला होता. परंतु, आता पुन्हा येरवडा कारागृहात एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सहायक तुरुंगाधिकारी सुनील तुकाराम गायकवाड (वय 55) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कैदी नौशाद बद्रुद्दीन शेख आणि इतर कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात 21 फेबुवारी रोजी सायंकाळी पाच व 22 फेबुवारी रोजी दुपारी चार ते साडेआठ वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहायक तुरुंगाधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना सर्कलच्या आवारात 21 फेबुवारी रोजी सायंकाळी पाहणी करत होते. त्या वेळी बाह्य शौचालयाच्या पाठीमागील बाजूला एक बंदी संशयास्पदरीत्या हालचाल करीत असल्याचे त्यांनी पाहिले.

ते त्या ठिकाणी गेल्यावर नौशाद बद्रुद्दीन शेख याने जमिनीवर पडलेला मोबाईल फोन त्यांच्या हातात दिला. शेख याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन तो निघून गेला. फिर्यादी यांनी मोबाईल सापडल्याचा वरिष्ठांना अहवाल दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृह उपमहानिरीक्षक यांची विशेष झडती मोहिमेसाठी परवानगी घेतली. या परवानगीनुसार 22 फेबुवारी रोजी त्यांनी सायंकाळी चार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान ही विशेष झडती मोहिम हाती घेण्यात आली. तपासाची व्याप्ती वाढवल्यानंतर बराक 1 आणि 6 इथे एकूण पाच मोबाईल, दोन पॉवर बँक आणि चार्जिंग वायर जप्त करण्यात आली.

कारागृहाच्या तटबंदीच्या आत इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल सापडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे . कारागृहात परवानगी नसताना मोबाईल फोन, पॉवर बँक, चार्जिंग वायर आणल्याबद्दल नौशाद शेख व इतर कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT