Pune Women Bike Rally Pudhari
पुणे

Pune Women Bike Rally: 'पुढारी' महिला बाईक रॅलीने पुणे दुमदुमले; परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम

नऊवारी साडी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांत महिलांचा जल्लोष; गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर भव्य रॅली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह... आदिवासी नृत्याचा साज... पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषेच्या रंगतदार दर्शनाने आणि जयघोषाने ‌‘पुढारी महिला बाईक रॅली‌’चे वातावरण रविवारी (दि. 15)भारावून गेले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत महिलांनी परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवून आणत शहराचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’, ‌‘हर हर महादेव‌’, ‌‘शिवाजी महाराज की जय‌’, ‌‘छत्रपती संभाजी महाराज की जय‌’, ‌‘सावित्रीबाई फुलेंचा विजय असो‌’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. काही महिला पारंपरिक नऊवारी साडी, फेटे आणि दागिन्यांनी सजलेल्या दिसत होत्या, तर काहींनी पांढरा कुर्ता आणि जीन्स असा आधुनिक पोशाख परिधान केला होता. त्यामुळे रॅलीत परंपरेची झलक आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास एकाच वेळी पाहायला मिळाला.

रॅलीदरम्यान मुख्य मंचासमोर सादर झालेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या दमदार तालावर बाईक रॅलीला सुरुवात झाली. ‌‘म्हाळसा-बानो‌’ तसेच ‌‘कृष्ण-राधा‌’ यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रॅलीत सर्वत्र महिलांनी सेल्फीमध्ये आनंदाचे क्षण टिपले. शास्त्री रस्ता, कुमठेकर रस्ता, शनिवारवाडा या मार्गावरून जात असताना रॅली काही क्षण दगडूशेठ गणपती मंदिरासमोर थांबली. सर्वांनी गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले आणि ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’चा गजर केला. बाप्पाचे आशीर्वाद घेऊन रॅली शिवाजी रस्त्यावरून मार्गस्थ झाली. जवळपास एक तास चाललेल्या रॅलीची ‌‘पुढारी भवन‌’ येथे सांगता झाली. महिलांचा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता.

जागर नवविचारांचा...

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत काही महिलांनी प्रतीकात्मक छोटी गुढी आणली होती. पुरुषांनीच गुढी उभारावी, या मान्यतेला छेद देत महिलांनी आधुनिक विचारांचा जागर केला.

ढोल-ताशांचा घुमला नाद

रॅलीची सुरुवात ढोल-ताशांच्या दमदार गजरात झाली. तालावर ठेका धरत महिलांचा बाईक ताफा पुढे सरकत असताना परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या लयीत महिलांनीही जल्लोष करीत रॅलीत रंगत आणली.

हेल्मेटवरील पुणेरी पाट्यांनी वेधले लक्ष

रॅलीमध्ये एका महिलेने चक्क हेल्मेटवर छोट्या पुणेरी पाट्या मिरविल्या. ‌‘मनुष्याची सर्दी आणि पुण्याची गर्दी सकाळी जामच असते‌’, ‌‘खराब आल्यास वडिलांना जाब विचारावा, आम्हास नाही‌’, ‌‘बाहेर उकाडा आहे म्हणून एटीएममध्ये हवा खायला जाऊन टाइमपास करू नका‌’, ‌‘इथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील,‌’ अशा पाट्यांनी लक्ष वेधून घेतले.

आबालवृद्धांचा सक्रिय सहभाग

रॅलीमध्ये चिमुरडीपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी हिरिरीने सहभाग घेतला. रविवारी सकाळी घरातून बाहेर पडून रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झालेल्या महिलांचे कलाकारांनीही तोंडभरून कौतुक केले.

मोपेड, बुलेट ठरल्या ‌‘शो स्टॉपर‌’

रॅलीमध्ये बहुतांश महिला मोपेड दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या. तर, काहींनी बुलेटवरून रॅलीमध्ये सहभागी होण्यास प्राधान्य दिले. या वेळी गाडीवर काहींनी गुढी उभारली, तर काहींनी सामाजिक संदेश देण्यावर भर दिला. काहींनी गाड्यांना आकर्षक सजावट केली होती.

झलक पारंपरिक वेशभूषेची

नऊवारी साडी, डोक्यावर फेटे आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेल्या महिलांनी रॅलीत मराठमोळा साज खुलवला. बाईकवरून मार्गक्रमण करताना त्यांच्या वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक पोशाखातून मराठी संस्कृतीचा अभिमानही व्यक्त होताना दिसला.

‌‘पर्यावरण वाचवा‌’चा संदेश

रॅलीत चित्रकलेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ‌‘पृथ्वी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा‌’, ‌‘भविष्य बदलू नका‌’, असा संदेश देणारे पोस्टर्सही रॅलीत झळकले.

महिला भव्य बाईक रॅलीत महिला-युवतींना इतक्या मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहून खूप छान वाटले. अस्सल मराठमोळ्या पेहरावात महिला-युवतींना बाईक चालवताना पाहणे अभिमानाची गोष्ट होती. दै. ‌‘पुढारी‌’ने महिला सक्षमीकरणासाठी ही रॅली आयोजित केली, हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. महिलाशक्तीची ताकद या वेळी पाहायला मिळाली, असे उपक्रम नेहमीच राबविले पाहिजेत.
अक्षय पाटील, अभिनेते,‌ ‘सन मराठी‌’वरील ‌‘हुकूमाची राणी‌’ मालिकेतील ‌‘इंद्रा‌’
दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने आयोजित महिला भव्य बाईक रॅलीत सहभागी होऊन खूप आनंद झाला. हा उपक्रम खूप चांगला होता. रॅलीत सहभागी झालेल्या महिला-युवतींचा उत्साह आणि ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत महिला विविध क्षेत्रांत कशी प्रगती करीत आहेत, याची प्रचिती या रॅलीतून आली. मी मूळची पुण्याची आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवरून जेव्हा ही रॅली जात होती, ते पाहून खूप अभिमान वाटला.
वैभवी चव्हाण, अभिनेत्री,‌ ‘सन मराठी‌’वरील ‌‘हुकूमाची राणी‌’ मालिकेतील ‌‘राणी‌’
महिला भव्य बाईक रॅली उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद आहे. सहभागी प्रत्येकीचा आत्मविश्वास अन्‌‍ ऊर्जा कमालीची होती. महिलाशक्ती एकवटली तर काय होते, याचा प्रत्यय पुणेकरांनी रॅलीतून घेतला. महिला-युवतींकडून आम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. रॅलीत सहभागी झाल्याचा क्षण माझ्यासाठी खास होता. रॅलीत सहभागी झाल्याचा अनुभव खूप छान होता. रॅलीत सहभागी प्रत्येकीचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
अंकिता पनवेलकर, अभिनेत्री,‌ ‘सन मराठी‌’वरील ‌‘हुकूमाची राणी‌’ मालिकेतील ‌‘मालती‌’
दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’ आयोजित महिला भव्य बाईक रॅलीसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आज समाजाला गरज आहे. अशा उपक्रमातून महिला-युवतींची ताकद काय आहे, हे समाजाला कळते. या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद आहे. आज एखादा आजार झाला, तरी महिला आजाराच्या उपचारांसाठी वेळीच पुढे येत नाहीत. तसेच, कर्करोगाविषयीही त्यांच्यात जागृती नसते. महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले पाहिजे. क्रस्ना डायग्नोस्टिकच्या माध्यमातून सवलतीच्या दरात महिलांच्या सर्व आरोग्य तपासण्या होतात. तसेच, कर्करोगाबाबत खूप सजग असले पाहिजे. थोडी जरी शंका आली, तरी तत्काळ तपासण्या केल्या पाहिजेत. त्यामुळे लवकरात लवकर आजाराचे निदान कळते. कर्करोग असो वा कोणताही आजार, त्याचे वेळीच निदान होऊन उपचार मिळावेत, यासाठी महिलांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढली पाहिजे. भारतातील पहिले कर्करोगावरील सर्व उपचार एकाच छताखाली व खूपच सवलतीच्या दरात मिळणारे ‌‘आपुलकी‌’ हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत सुरू आहे.
डॉ. प्रीतेश मुनोत, चेअरमन आणि मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, आपुलकी मेडिकल सेंटर
दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करण्यासाठी आयोजित केलेला ‌‘महिला भव्य बाईक रॅली‌’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि वेगळा आहे. महिला-युवतींची शक्तीची ताकद या रॅलीतून पुणेकरांना पाहायला मिळाली. पर्यावरण ते जल संवर्धनापर्यंतचे जनजागृती करणारे संदेशही महिला-युवतींनी रॅलीतून दिले, हे वाखाणण्याजोगे आहे. या उपक्रमात सहभागी होऊन आनंद वाटला.
उमेश अंगरखे, संचालक, अर्चित एंटरप्राईज
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उपक्रमात सहभागी होऊन खूप आनंद झाला. महिलाशक्ती एकवटली तर काय करू शकते, हे महिला-युवतींच्या बाईक रॅली उपक्रमातून पुणेकरांना पाहायला मिळाले. आम्ही ‌‘रूट स्किल्स‌’च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत आहोत. हाच पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश महिला- युवतींनी बाईक रॅलीतून दिला, ही खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल. आमच्याकडून महिला-युवतींना विविध प्रकारच्या झाडांच्या बिया भेट देण्यात आल्या. त्याद्वारे ‌‘झाडे लावा, झाडे जगवा‌’चा संदेश रुजविण्याचा आम्ही प्रयत्न केला.
भाविशा बुद्धदेव, संस्थापिका, रूट स्किल्स
महिला भव्य बाईक रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचा आत्मविश्वास पाहून खूप आनंद वाटला. महिला आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहेत, त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला किती सक्षम आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. याचाच प्रत्यय बाईक रॅलीतून घेता आला. महिलांनी मोठ्या आत्मविश्वासाने बाईक चालवत ‌‘हम किसी से कम नहीं‌’ हे दाखवून दिले. दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’चा ‌‘महिला भव्य बाईक रॅली‌’ हा उपक्रम खूप स्तुत्य आहे.
अंजली तुपे, व्यवस्थापिका, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी
दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. त्यातीलच एक म्हणजे महिला भव्य बाईक रॅली. महिलांनी एकत्र येऊन बाईक चालवत विविध सामाजिक संदेश देत जनजागृती करण्याचा हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकीने मोठ्या उत्साहात रॅलीत सहभाग घेतला आणि महिलांची ताकद काय असते, हे दाखवून दिले. आम्ही या उपक्रमात सहभागी झालो, याचा आनंद आहे. अशा उपक्रमांना आम्ही नेहमीच पाठिंबा देतो, असे उपक्रम होणे खूप गरजेचे आहे.
डॉ. निखिल गोसावी, संचालक, एम्ब्रोनिक फर्टिलिटी अँड आयव्हीएफ सेंटर
आज प्रत्येक क्षेत्रात महिला स्वत:ला सिद्ध करीत आहेत, प्रत्येकीने आपापल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. अशा विविध क्षेत्रांतील महिला अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत मोठ्या आत्मविश्वासाने सहभागी झाल्याचे पाहून आनंद वाटला. आम्हीही रॅलीला आमचा पाठिंबा दर्शविला. कारण दै. ‌‘पुढारी‌’ने आयोजित केलेल्या अशा उपक्रमांतून महिलांना व्यासपीठ मिळते आणि त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. रॅलीत सहभागी झालेल्या महिलांच्या उत्साहाचे कौतुक आहे.
मोनिका नीलेश बोथरा, संचालक, टायगर बँड-रेडी टू कूक मसाले
मोठ्या संख्येने महिला-युवती बाईक रॅलीनिमित्त एकत्र आल्या ही दै. ‌‘पुढारी‌’ची ताकद म्हणावी लागेल. प्रत्येकीचा उत्साह, ऊर्जा आणि आत्मविश्वास खूप प्रेरणादायी होता. महिलांचा बाईक रॅलीसारखा उपक्रम वर्षातून चारवेळा व्हायला हवा. स्त्रीसन्मानासाठी अशा रॅली होणे खूप गरजेचे आहे. महिला सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश याद्वारे समाजापर्यंत पोहचतो. उपक्रमात सहभागी होऊन आनंद वाटला.
भूपेंद्र सिंग, संचालक, सुवर्णकला जेम्स अँड ज्वेलरी
बाईक रॅलीत सहभागी होण्याचे निमित्त खास होते. महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने बाईक चालविल्या. महिला हे जग बदलू शकते, हे आज सिद्ध झाले. रविवारची सकाळ असूनही महिला रॅलीला आल्या, हे पाहून खूप छान वाटले. रॅलीचे नियोजनही शिस्तबद्ध होते. महिला सक्षमीकरणासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. अशा कार्यक्रमांतून महिलांचा आत्मविश्वास काय आहे, हे दिसते.
डॉ. पी. के. ग््राँट, ग््राँट मेडिकल फाउंडेशनचे रुबी हॉल क्लिनिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT