

शंकर कवडे
पुणे: युद्धकालीन आणि काटकसरीचा उपाय म्हणून गॅसपुरवठ्यात कपात केल्याने निर्माण झालेल्या गॅस सिलिंडर तुटवड्याचा परिणाम आता मार्केट यार्डातील फळभाज्यांच्या व्यवहारावर दिसू लागला आहे. हॉटेल आणि खानावळी मोठ्या प्रमाणात बंद असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात भाज्यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. दरम्यान, पाण्याच्या टंचाईमुळे फळभाज्यांची आवकही कमी झाली आहे.
मात्र, अपेक्षित मागणी नसल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी घसरले आहेत. रविवारी भाज्यांची मोठी विक्री अपेक्षित असताना अनेक गाळ्यांवर माल शिल्लक राहिल्याचे चित्र होते. घाऊक बाजारात रविवारी (दि. 15) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी आहे. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 2 ते 3 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे 3 ते 4 टेम्पो, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून मटार 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक आणि गुजरात येथून प्रत्येकी 2 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 8 ते 10 टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा 25 ते 30 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 250 ते 300 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 15 ते 20 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, घेवडा 2 ते 3 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, कांदा सुमारे 120 टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डमधील अडते निखिल भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्या झाल्या स्वस्त
मार्केट यार्डात पालेभाज्यांची मोठी आवक होत आहे. मात्र, फळभाज्यांप्रमाणेच पालेभाज्यांच्या विक्रीवर गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे बंद असलेल्या हॉटेल आणि खानावळीचा परिणाम झाला आहे. मागणी घटली आहे. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, चाकवत, पुदिना, चुका आणि हरभरा गड्डीच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पुणे जिल्ह्यासह विभागातून पालेभाज्यांची आवक होत आहे. येथील बाजारात रविवारी (दि. 15) कोथिंबिरीची दीड लाख जुडीची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. घाऊक बाजारात एका जुडीला दर्जानुसार 8 ते 12 रुपये भाव मिळत आहे. मागील आठवड्यात 60 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज 70 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली.