पुणे: निसर्गचक्राच्या परिघावर जेव्हा मानवी हस्तक्षेप वाढतो, तेव्हा ’वुल्फ डॉग’ सारखी संकरित संकटे शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपतात. पुण्याच्या टेकड्यांवर सध्या रानटीपणा आणि पाळीवपणा यांच्यातील सीमा पुसली गेली असून, या ‘हायबिड’ शिकारी प्राण्यांनी वन विभागाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. टेकडीप्रेमींच्या मुक्त संचाराला लागलेली ही भीतीची खीळ रोखण्यासाठी वनविभाग आणि महापालिका आता ‘ऑपरेशन वुल्फ डॉग’च्या सज्जतेत आहेत.
वन विभाग प्रामुख्याने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत काम करीत असून, वुल्फ डॉगच्या बाबतीत वन विभागाने अलीकडच्या काळात गस्त वाढवली आहे. पुण्यातील वेताळ, हनुमान टेकडी आणि रामनदीच्या पट्ट्यात वनरक्षकांची गस्त वाढविण्यात आली आहे. ज्या भागात या प्राण्यांनी नागरिकांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे, तिथे वन विभागाने पिंजरे लावले आहेत.
वन विभागाच्या वतीने पकडलेला प्राणी नक्की कोणता आहे, लांडगा की संकरीत कुत्रा, हे तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. जर, तो पूर्णपणे लांडगा असेल, तर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडले जात आहे. अनेक सोसायट्या तसेच नागरिकांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचनाही वन विभागाच्या वतीने देण्यात आल्याचे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘वुल्फ डॉग’ म्हणजे काय?
शहरातील बाणेर, पाषाण, कोथरूड आणि वारजे यांसारख्या टेकड्यांच्या परिसरात आढळणारे हे प्राणी पूर्णपणे लांडगे नसून, ते लांडगे आणि पाळीव कुत्रे यांचा संकरीत असल्याचे मानले जाते. हे प्राणी दिसायला लांडग्यासारखे असले तरी त्यांच्यात कुत्र्या सारखी आक्रमकता, मानवी वस्तीत घुसण्याची सवय जास्त असते.
वुल्फ डॉग संदर्भात सर्व वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे वन कर्मचाऱ्यांची गस्तही वाढविण्यात आली आहे. वुल्फ डॉगबाबत नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर आवश्यकते नुसार पिंजराही लावण्याची व्यवस्था केली जात आहे.महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग