पुणे: यंदाच्या हंगामात राज्यात सर्वांत नीचांकी तापमान शहरातील एनडीए भागाचे किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. यापूर्वी २७ नोव्हेंबर १९६४ रोजी शहराचे किमान तापमान ४.६ अंश इतके नोंदले गेले होते.
अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा शहरात थंडीचे आगमन उशिरा झाले. दिवाळीत गारठणारे शहर यंदा दीपावली संपताच किंचित गारठू लागले आहे. शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी तापमान एनडीए भागाचे नोंदले गेले. तर, शिवाजीनगरचा पारा १४.३ अंशांवर होता.
नोव्हेंबरमध्ये शहरात यापूर्वी किमान तापमानाचा पारा ४.६ ते ९ अंशांवर अनेकवेळा खाली आला आहे. मात्र, यंदा पारा १० अंशांपेक्षा खाली जाण्याची शक्यता फार कमी आहे. कारण, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याने उष्ण-दमट वारे राज्यात वारंवार येत आहे.
शुक्रवारचे शहरासह जिल्ह्याचे किमान तापमान
एनडीए ११.९, शिवाजीनगर १४.३, पाषाण १४.५, पुरंदर १४.९, अंबेगाव १५.८, चिंचवड १८.३, मगरपट्टा १८.२, हडपसर १६.३, माळीण १२.६, तळेगाव १४, बारामती १४.४
नोव्हेंबरमधील नीचांकीचे विक्रम
२७ नोव्हेंबर १९६४— ४.६
१९ नोव्हेंबर २०१२— ७.९
२७ नोव्हेंबर २०१६— ९.३
१७ नोव्हेंबर २०१३— ९.९
३०नोव्हेंबर २०१४— ११.२
१८ नोव्हेंबर २०१५ — १२.९
३ नोव्हेंबर २०१७ — ११.४
१२ नोव्हेंबर २०२१ — ९.८