

ओतूर: ओतूर-कल्याण महामार्गावरील निमंत्रण हॉटेलसमोर चारचाकी कॅरी आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी(दि.१२) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ओंकार दिनकर अमूप (वय २४, रा. उदापूर, ता. जुन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे उदापूर परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ओतूर येथून कल्याणच्या दिशेने जाणारी चारचाकी कॅरी ( एमएच १४ एमटी ८४९१) आणि कल्याणच्या दिशेकडून ओतूरकडे येणारी मोटारसायकल ( एमएच १४ जीजे ४९७८) यांच्यात निमंत्रण हॉटेलसमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलस्वार ओंकार अमूप गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
एकमेव कर्ता हरपला
या अपघातातील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे ओंकार हा कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे.त्याचे १३ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते, कुटुंबाचा मुख्य आधार असलेला तरुण अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आईचा आधार, पत्नीचा जीवनसाथी व भविष्याचा कणा असलेला ओंकार काळाने हिरावून नेल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव बांबळे, योगेश उकिरडे व महिला पोलीस कर्मचारी प्रितम लोहटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार नामदेव बांबळे करीत आहेत.
एका क्षणात संसाराचा आधार हरपला
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या ओंकारच्या अकाली निधनाने एका कुटुंबाचे छत्र हरपले असून उदापूरसह ओतूर परिसरात या घटनेने शोककळा पसरली आहे.