पुणे: पुणे येथील घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात साखर, खाद्यतेले, डाळी, बेसन, नारळ आणि शेंगदाणा या जिनसांच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाली. आवक कमी प्रमाणात होत असून, मागणी चांगली असल्याने बाजारात सध्या तेजीचे वातवरण असल्याचे सांगण्यात आले.
उसाच्या तुटवडयामुळे सोलापूर भागातील काही साखर कारखाने बंद झाली आहेत अन्य भागातही कारखान्यांना ऊसाची कमतरतता जाणवत आहे. यामुळे साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वीच्या अंदाजानुसार यंदा 320 लाख टन इतके उत्पादन अपेक्षित होते. मात्र नव्या अंदाजानुसार उत्पादन सुमारे 300 टन इतके होईल. यामुळे कारखान्यांकडून विक्री कमी प्रमाणात होऊ लागली आहे.
सध्या बाजारात साखरेस मागणी वाढली असून पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. यामुळे गेले अनेक दिवस स्थिर असलेल्या साखरेच्या दरात गेल्या आठवडयात क्विंटलमागे 50 ते 60 रुपयांनी वाढ झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3975-4025 रुपये होता. आवक जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवउयातही साखरेच्या दरातील तेजी कायम होती.
खाद्यतेले आणखी महागली:
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सुर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाचे दर तेजीत आहे. अमेरिकेन डॉलरच्या तुलनेने भारतीय रुपयाचा दर निचांकी घसरल्याने खाद्यतेलांची आयात महागडी ठरत आहे. दरम्यान देशांतर्गत बआजरात तुटवडयामुळे शेंगदाण्याचे दरही कडाडले आहेत. यामुळे गेल्या आठवडयातही शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दर 15 किलो / लिटरच्या डब्यामागे आणखी 30 ते 40 रुपयांनी वाढले. यामुळे वनस्पती तुपाचे दरही 30 ते 40 रुपयांनी वाढले. मात्र खोबरेल तेलाचे दर स्थिर होते.
तुरडाळ, उडीदडाळ दरात मोठी वाढ
हंगाम सुरु होऊन देखील अद्यापपावेतो बाजारात अपेक्षित प्रमाणात नव्या तुरची आवक होत नाही. त्यातच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून हमी भावात तुरीची खरेदी सुरु झाल्यामुळे तुरीचे दर कडाडले आहेत. यामुळे तुरडाळीची दरवाढड सुरुच आहे. गेल्या आठवडयातही तुरडाळीच्या दरात क्विंटलमागे आणखी 500 ते 600 रुपयांनी वाढ झाली. मागणी चांगली असून अपेक्षित प्रमाणात आवक होत नसल्याने उडीदडाळीचे दर क्विंटलमागे एक हजार रुपयांनी तर हरभराडाळीच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली. हरभराडाळीच्या दरवाढीमुळे बेसनही 50 किलोमागे शंभर रुपयांनी महागले. मागणी कमी असून आवक वाढल्याने हिरव्या वाटाण्याच्या दरात क्विंटलमागे आणखी एक हजार रुपयांनी घट झाली.