पुणे: प्रमुख चौकात पाण्याच्या निचऱ्याची उत्तम व्यवस्था केल्याच्या महापालिकेच्या दाव्याची हवा निघाली. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 260 ठिकाणी पाणी साठण्याची समस्या होती. ही समस्या या वर्षीही कायम आहे. या ठिकाणावरून पाणी निचऱ्यास सरासरी 28 मिनिटे, तर काही ठिकाणी तब्बल तीन तास लागत आहेत. दरवर्षी तीच ठिकाणे ‘रेड झोन’ ठरत असून, पाणी निचऱ्याची चांगली यंत्रणा उभारण्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, हा दावा दोन दिवस झालेल्या पावसामुळे फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाने तयार केलेल्या यादीतील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, समस्येची मूळ कारणे वर्षानुवर्षे तीच आहेत. शहरात अनेक भागांत पावसाळी वाहिन्या नाहीत. सखल भाग असणे, प्रवाहात कचरा अडकल्याने निचरा बंद होणे तसेच चेंबरमध्ये गाळ साचणे, ही प्रमुख कारणे मोठ्या प्रमाणावर समोर आली आहेत. यावरून शहरात मूलभूत पायाभूत सुविधाच अपुऱ्या असल्याचे स्पष्ट होत आहे.
अनेक ठिकाणी पावसाळी लाइन अस्तित्वातच नसल्याचे किंवा आहे त्यांचा व्यास व त्यांची क्षमता कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या अनेक वर्षांत विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाच्या पाण्याचा निचरा होणे, ही साधी समस्याही सुटली नाही, हे स्पष्ट झाले आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, बहुतांश ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांऐवजी तात्पुरत्या उपायांवरच भर दिला जात आहे. ‘कचरा काढणे’, ‘जेटिंग मशिन वापरणे’, ‘कामगार नेमणे’ अशा तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात पुणे तुंबण्याची समस्या ही कायम राहते.
निश्चित केलेल्या तब्बल 25 टक्के ठिकाणी साचले पाणी
महापालिकेने निश्चित केलेल्या पाणी साचणाऱ्या 260 ठिकाणांपैकी तब्बल 25 टक्के ठिकाणी पाणी किमान 15 मिनिटे साचून राहते, तर 50 टक्के ठिकाणी हा कालावधी 30 मिनिटांपर्यंत आहे. काही ठिकाणी 180 मिनिटांपर्यंत म्हणजेच 3 तास पाणी साचून राहते.
पूर्वतयारीचा दावा फोल
महापालिकेमार्फत पावसाळापूर्व कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. यासाठी निविदा देखील काढल्या जातात. ड्रेनेजलाइन, पावसाळी वाहिन्या व नालेसफाईची कामे प्रामुख्याने केली जातात. मात्र, ही कामे ठेकेदार थातूरमातूर पद्धतीने करीत असल्याचे उघड झाले आहे. अनेकवेळा निविदा 30 ते 40 टक्के कमी दराने मंजूर केल्या जातात. त्यामुळे ही कामे दर्जात्मक होत नाहीत. प्रत्यक्षात त्याच ठिकाणी पुन:पुन्हा पाणी साचत असल्याने नियोजनातील त्रुटी, कामातील हलगर्जीपणा आणि उत्तरदायित्वाचा अभाव समोर आला आहे.
अनेक ठिकाणांची नोंदच नाही
महापालिकेने शहरात केवळ 260 पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी केली आहे. मात्र, या यादीत पाणी साठणाऱ्या अनेक ठिकाणांच्या नोंदी नाहीत. समाविष्ट गावांत देखील पाणी साठणाऱ्या क्रोनिक स्पॉटची संख्या मोठी आहे, तर शहराच्या मध्य भागातही पाणी साठणारी अनेक ठिकाणे आहेत. मात्र, महापालिकेने केवळ 260 ठिकाणी पाणी साचत असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे या यादीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
शहरामध्ये 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पावसाळी चेंबर्स साफसफाई व नाले साफसफाईसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामे सुरू करण्याबाबत संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये साधारणपणे 50 ते 100 बिगारी, चार जेसीबी, अशी यंत्रणा दररोज कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते, अशी शहरातील 260 ठिकाणे निश्चित केली असून, त्याचे कॅटेगरायझेशन करून पुढील एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी कामे पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वीची ही सर्व कामे साधारणपणे 15 मेपर्यंत पूर्ण होतील.नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका