

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. भरत पोपट गायकवाड असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात भष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कान्हूर मेसाई येथील तक्रारदाराच्या जागेवर काही व्यक्तींनी अतिक्रमण करून घर उभारले होते. या प्रकरणात संबंधितांनी ग्रामसेवकाकडून नियमबाह्य पद्धतीने 8-अ उतारा तयार करून घेतल्याचा आरोप आहे.
याबाबत न्याय मिळावा म्हणून तक्रारदाराने शिरूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी गायकवाड याने तक्रारदाराकडे थेट 10 ते 15 हजार रुपयांची लाच मागितली. लाच स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
याबाबत तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. 6 जानेवारी रोजी एसीबीने सापळा रचून पडताळणी केली असता, गायकवाड याने स्वतःसाठी आणि ग्रामसेवक घासले यांच्या नावाने 2 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर 1 एप्रिल रोजी एसीबीने कारवाई करत गायकवाडला अटक केली अशी माहिती पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी दिली.