

भोर: भोर तालुक्यात गेली तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे घरांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वडगाव डाळ (ता. भोर) येथील शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी गुरुवारी (दि. 3) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरपावसात केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून महसूल, कृषी अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.
भोर तालुक्याला गेली तीन दिवस पावसाने झोडपले आहे. गारांसह झालेल्या पावसाने बहुतांशी शेतकऱ्यांच्या रब्बी तसेच उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले. कृषिमंत्री भरणे यांनी गुरुवारी वडगाव डाळमधील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी भरणे यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले. अनेक घरांची पावसामुळे झालेली पडझड पाहून भरणे यांनी तहसीलदारांना याबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.
भरणे यांनी वडगाव डाळचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, तहसीलदार राजेंद्र नजन, सभापती मनीषा कंक, गटविकास अधिकारी रामचंद्र विपट, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, नगरसेवक केदार देशपांडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, तलाठी राजेश जाधव तसेच वडगावचे सरपंच नवनाथ चौधरी, तुकाराम पवार, सुधीर खोपडे, सागर बरके, सचिन खोपडे, दशरथ डाळ, नितीन डाळ, रमेश गायकवाड, संदीप शेटे, नवनाथ डाळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवकाळी पावसाचा फटका भोर तालुक्यासह राज्यातील 3 लाख 500 हेक्टर वरील पिकांंना बसला आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.