पुणे: पुण्याचा पाणीवापर वाढल्याने दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील शेतीवर परिणाम होत आहे. पुणेकर जेवढे पाणी वापरून सोडून देत आहेत, त्यापैकी 80 टक्के पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सिंचनासाठी सोडणे अपेक्षित आहे.
मात्र, केवळ 30 ते 40 टक्के पाण्यावरच प्रक्रिया होत आहे. यामुळे एचटीपी प्रकल्पाची संख्या वाढवणे गरजचे आहे. यासाठी पुण्यासह समाविष्ट गावात तसेच नदीशेजारी असणार्या ग्रामपंचायतींचे क्लस्टर करून थेट पाण्यावर प्रक्रिया केंद्रे उभारणार असल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. (Latest Pune News)
पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्विराज बी. पी. तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, पुणे महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर केला जात नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. गळतीदेखील खूप होत आहे. पुणे महानगरपालिका 22 टीएमसी पाण्याचा वापर करत आहे.
शहराला केवळ 14 टीमएमसी पाणी मंजूर असताना आठ टीएमसी पाणी जाते कुठे? असा सवाल उपस्थित करत पाण्याचा अपव्यय टाळून पुनर्वापर करण्यासाठी व गळती शोधण्यासाठी पुणे महापालिका व जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांचा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.