Water Tanker Pudhari
पुणे

Pune Water Crisis: पालिकेच्या पाण्यावर खासगी टँकरचालकांची मौज

या प्रकारामुळे पुणेकरांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली असून, टँकरची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या २२, तर खासगी ४०० टँकरद्वारे रोज १६०० ते १७०० टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

महापालिकेच्या टँकर पॉइंटवरून ६५० रुपयांचे चलन भरून खासगी टँकरवाले त्यांची तीन हजार रुपयांना विक्री करीत आहेत. महापालिकेच्या पाण्यावर खासगी टँकरवाले आपले उखळ पांढरे करीत असून, यावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. या प्रकारामुळे पुणेकरांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लागू झाल्यानंतर पुणेकरांची तहान भागविण्याची जबाबदारी आता मोठ्या प्रमाणात टँकरवर येऊन पडली आहे. महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा अनेक भागांत पुरेशा दाबाने आणि वेळेवर होत नसल्याने टँकरची मागणी झपाट्याने वाढली आहे.

महापालिकेकडे अवघे २२ टँकर उपलब्ध असताना खासगी सुमारे ४०० टँकर महापालिकेकडून पाणी घेऊन शहरभर पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र, हे पाणी नागरिकांना देताना खासगी टँकरचालकांकडून मनमानी दर आकारले जात असून, त्यावर महापालिकेचे कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याने नागरिकांची आर्थिक लूट होत आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ज्या भागांत नळाद्वारे पाणी पोहचत नाही किंवा अत्यल्प प्रमाणात मिळते, त्या भागांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर या मोफत टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

परिणामी, महापालिकेच्या टँकरच्या रोजच्या सुमारे १०० अतिरिक्त फेऱ्या कराव्या लागत असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि वाहनांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. खासगी टँकरची मागणीही लक्षणीय वाढली आहे.

महापालिकेकडून ६५० रुपयांचे चलन घेऊन खासगी टँकरचालक पाणी भरून घेत हेच टँकर जादा दराने विकत आहेत. काही ठिकाणी हे दर १२००, तर काही ठिकाणी २ हजार ते ३ हजार रुपये एका टँकरमागे आकारले जात आहेत. अंतर आणि मागणीचा आधार घेत हे दर मनमानी पद्धतीने ठरविले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पर्याय नसल्याने मोजावी लागतेय रक्कम

खासगी टँकरच्या दरांवर महापालिकेचे कोणतेही प्रभावी नियमन नसल्याने नागरिकांना पर्यायही उपलब्ध राहत नाही. पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी अनेक गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांना वाढीव रक्कम मोजावी लागत आहे.

वाढती मागणी पूर्ण करताना महापालिकेची दमछाक

पाण्याची वाढती मागणी पूर्ण करताना महापालिकेची यंत्रणेची अक्षरशः दमछाक होत आहे. उपलब्ध टँकर, कर्मचारी आणि पाणीभरणी केंद्रांवर वाढलेल्या ताणामुळे अनेक भागांत टँकर पोहचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत असून, खासगी टँकरच्या दरांवर नियंत्रण, टँकरच्या जीपीएसद्वारे देखरेख, दरनिश्चिती आणि पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

महापालिकेच्या टँकरसाठी प्रतीक्षा

महापालिकेमार्फत मोफत टँकर दिले जात आहेत. समाविष्ट गावांतील सोसायट्यांना या टँकरने पाणी दिले जाते. आठवड्यातून केवळ दोन ते तीन टँकरने पाणी दिले जाते. मात्र, ही संख्या अपुरी आहे. त्यात हे टँकर देखील अनियमित आहेत. पाच ते सहा दिवस टँकर येत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना मोफत टँकर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोज महापालिका आणि खासगी टँकरद्वारे १६०० ते १७०० फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दर नियांत्रित करण्यासाठी लवकरच नवी नियमावली करणार आहोत. यानंतर नागरिकांना यातून दिलासा मिळेल.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT