Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Supply: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरात सध्या पाणीकपात नाही; नियमित पाणीपुरवठा सुरू

धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणीकपात टळली; अफवांवर विश्वास ठेवू नका, महापौर मंजूषा नागपुरे यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणेकरांना सध्या कोणत्याही प्रकारच्या पाणीकपातीचा सामना करावा लागत नसून, शहरात नियमित व नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुरू आहे, अशी स्पष्ट माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने तातडीने पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने गेल्या आठवड्यात धरणांतील पाणीसाठा आणि पावसाच्या स्थितीचा आढावा घेऊन २२ जुलैनंतर पाणीकपात पुन्हा सुरू करायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने सध्याच्या स्थितीत पुणेकरांना नेहमीप्रमाणेच पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील सर्व भागांमध्ये वेळापत्रकानुसार पाणी वितरित केले जात आहे. वितरण यंत्रणा, जलशुद्धीकरण केंद्रे आणि धरणांतील उपलब्ध साठा यांचा दररोज आढावा घेतला जात असून, कुठेही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तातडीने दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सध्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा जवळपास २० टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. पावसामुळे परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करावा, असे आवाहन महापौरांनी केले. तसेच, पाणीकपातीबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे सध्या शहरात कोणतीही पाणीकपात लागू केलेली नाही आणि नागरिकांना नेहमीप्रमाणे अखंड पाणीपुरवठा केला जात आहे. महानगरपालिका पाणीस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, पुणेकरांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
मंजूषा नागपुरे, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT