पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची खालावलेली पाणीपातळी, तसेच यंदा हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने खबरदारी म्हणून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करत दिवसाआड पाणी पुरवण्यावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या सोमवारपासून शहरात अधिकृतपणे 'दिवसाआड' पाणीकपात लागू केली जाणार आहे.
तसेच, पाणीबचतीसाठी वाॅशिंग सेंटर, स्वीमिंग पूल, बांधकाम यासाठी पाणी वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णयही घेतला आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक या आठवड्यात जाहीर केले जाईल, अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे व आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. पुण्याच्या पाणीपुरवठा नियोजनाचे आणि पाणीकपातीची तयारी करण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक महापौर मंजूषा नागपुरे यांनी सोमवारी घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाणीकपातीसंदर्भात त्यांनी माहिती दिली.
महापौर नागपुरे म्हणाल्या, की खडकवासला धरणसाखळीत केवळ ५.८७ टीएमसी जलसाठा शिल्लक राहिल्याने शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. धरणातील शिल्लक साठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने सोमवारपासून पाणीकपात लागू करण्याबाबत प्राथमिक नियोजन केले आहे. उपलब्ध साठा जुलै-अखेर किंवा ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत काटकसरीने वापरण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
तांत्रिक आव्हाने आणि दिवसाआड पुरवठ्याचे गणित
दिवसाआड पाणीपुरवठा करताना अनेक भागांमध्ये 'व्हॅक्युम' आणि पाइपलाइनमध्ये हवा कोंडण्याची तांत्रिक समस्या उद्भवते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पाणी पुरेशा दाबाने येत नाही. यावर उपाय म्हणून प्रशासनाने एक विशेष मॉडेल तयार केले आहे. यानुसार ज्या दिवशी पाणीपुरवठा सुरू असेल, त्या दिवशी अतिरिक्त दाबाने पाणी दिले जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
खडकवासला धरणसाखळीत पाणी साठा - ५.८७ टीएमसी
बाष्पीभवन - ०.४० टीएमसी
शहराला रोज लागणारे पाणी - १५०० एमएलडी
शहराला ३१ जुलैपर्यंत लागणारे पाणी - २.९२ टीएमसी
दौंड नगर परिषद व ग्रामीण भागासाठी पिण्यासाठी पाणी - ०.२७ टीएमसी
शिल्लक राहणारे पाणी - १.९७ टीएमसी
पालखी साठी राखीव पाणी - ०.५० टीएमसी
पाऊस लांबल्यास शहरासाठी राखीव पाणी (२० दिवस) - १ टीएमसी
पाणीकपातीचा निर्णय हा जाणीवपूर्वक लांबवला गेला होता, कारण पुण्यातील मे महिन्याची तीव्र उष्णता पाहता नागरिकांना त्रास होऊ नये, ही आमची भूमिका होती. मात्र, आता पाऊस लांबण्याची शक्यता ६० टक्के असल्याने सोमवारपासून पाणीकपात अटळ आहे. कपातीपूर्वी नागरिकांना स्वतःची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. पुणेकरांनी 'सेव्ह वॉटर' मोहिमेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.मंजूषा नागपुरे, महापौर
धरणातील सध्याचा उपयुक्त साठा केवळ ३ टीएमसी असून, तो पुढील ३ महिने पुरणारा नाही. हा केवळ तात्कालिक निर्णय नसून पाणी व्यवस्थापनाचे एक आवश्यक पूर्व-काळजीचे पाऊल आहे. सोमवारपासून कपातीचे नियोजन करताना शहरातील सर्व १५८ झोनमध्ये पाण्याची वितरण व्यवस्था समप्रमाणात राखली जाईल. पाणी वाया घालवणाऱ्या व्यावसायिक घटकांवर व बांधकाम साईट्सवर भरारी पथकांद्वारे कडक कारवाई करणार आहोत.नवल किशोर राम, आयुक्त