पुणे : शहरातील अनधिकृत नळजोड शोधण्यासाठी पुणे महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेने भाडेतत्त्वावर रोबोट आणून पाणीपुरवठा यंत्रणेचे निरीक्षण केले.(Latest Pune News)
या रोबोटच्या साहाय्याने वडगावशेरीतील गणेशनगर भागात 500 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत तब्बल 300 मीटर आत जाऊन 40 अनधिकृत नळजोड शोधण्यात आले आहेत. महापालिका आता स्वतःचा एक रोबोट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या अत्याधुनिक उपकरणाची किंमत सुमारे 90 लाख रुपये असून, तीन वर्षांचा देखभाल खर्च आणि मनुष्यबळासह एकूण किंमत दीड कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी 11 गावांमध्ये तसेच जुन्या हद्दीतील काही भागांमध्ये भोगवटापत्र आणि गुंठेवारी दाखला नसलेली बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत. आवश्यक कागदपत्रे नसल्याने अनेक नागरिक अधिकृत नळजोड घेऊ शकत नाहीत, परिणामी, अनधिकृत जोडणीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महापालिकेला महसुली तोटा सहन करावा लागतो, तसेच नागरिकांना प्रतिमाणशी किती पाणी मिळते, याचे अचूक मोजमाप करणेही अशक्य ठरते.
महापालिकेच्या मते, नागरिकांना अधिकृत नळजोड दिल्यास अनधिकृत जोड कमी होतील आणि महसूल वाढीस मदत होईल. याशिवाय, अनेक ठिकाणी होणारी पाणी गळती शोधणे अवघड जात असल्याने रोबोटचा वापर उपयुक्त ठरत आहे. हा रोबोट रिमोटद्वारे नियंत्रित केला जातो. त्याला चार चाके, उच्च क्षमतेचा कॅमेरा आणि प्रकाशयंत्र बसविण्यात आले आहेत. जलवाहिनीत सोडल्यावर तो आतील भागाचे निरीक्षण करतो आणि ते थेट स्क्रीनवर दृश्य स्वरूपात पाहता येते.
वडगावशेरी गणेशनगर येथे मुख्य जलवाहिनीत रोबोट उतरविण्यात आला असता दोन ठिकाणी गळती आणि तब्बल 40 बेकायदा नळजोड आढळून आल्या. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता वीरेंद्र केळकर, कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, तसेच कनिष्ठ अभियंते नितीन जाधव, रवींद्र वानखेडे आणि रामदास आढारी उपस्थित होते.
रोबोटच्या साहाय्याने अनधिकृत नळजोड आणि जलवाहिनीतील गळती लवकर शोधता येते. पुणे महापालिका लवकरच स्वतःचा रोबोट खरेदी करणार आहे. या रोबोटची किंमत सुमारे 90 लाख रुपये असून, तीन वर्षांचा देखभाल खर्च आणि मनुष्यबळासह किंमत दीड कोटींपर्यंत जाईल. या खरेदीसाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका