Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Cut Issue: पुण्यात पाणीकपात तीव्र; कमी दाब, अपुरा पुरवठा आणि टँकरवर अवलंबित्व वाढले

खडकवासला धरणसाखळीतील साठा घटल्याने सम-विषम पाणीपुरवठा; अनेक भागांत नागरिकांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

बाजीराव गायकवाड, मुकुंद कदम, रघुनाथ कसबे

पुणे: जून महिना अर्धा सरला, तरीही पावसाला सुरुवात झाली नाही. खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने महापालिकेने शहरात पाणीकपात सुरू केली आहे. सम आणि विषम तारखेनुसार प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंगळवार (दि.१६) पासून शहर आणि उपनगरांच्या विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात आला. कुठे कमी दाबाने, तर कुठे अपुरा पाणीपुरवठा करण्यात आला. त्‍यामुळे पाण्यासाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी स्‍थिती पाहायला मिळाली. याबाबत दै.’पुढारी’ने घेतलेला हा आढावा...

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, तीव्र पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे. पावसाळा लांबल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. तसेच, प्रशासनही दिवसाआड पाणी मिळेल, असे सांगत आहे. सध्या पुणे शहर आणि उपनगर परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. धनकवडी, आंबेगाव पठार परिसर उंच व सकल असल्याने कमी दाबाने वेळी-अवेळी पाणीपुरवठा केला जातो. आंबेगाव पठारमधील सोळा नंबरचा व भिंताडेनगर परिसर महापालिकेत समाविष्ट झाला असला, तरी पाणी टॅंकरने पुरवले जात आहे. पाणी कमी दाबाने मिळत असले, तरी दररोज किमान एक तास तरी मिळावे, अशी स्‍थानिकांची मागणी आहे.

धनकवडी परिसरात पाणीटंचाई जाणवत असून माॉलसारख्या ठिकाणांना पाणी मिळते. मात्र, धनकवडी परिसराला कमी दाबाने वेळी अवेळी पाणी मिळते. दररोज ठरावीक वेळी एक तास तरी पाणी मिळावे, ही अपेक्षा आहे.
अनिल भोसले, सामाजिक कार्यकर्ते

जून महिना अर्धा संपत आला तरीही पावसाला सुरुवात झाली नसल्याने पुणे महापालिकेने शहरात पाणीकपात सुरू केली आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची भागात देखील दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने होरपळलेल्या काही रहिवाशांना दिवसाआड होणारा हा पाणीपुरवठाही सुसह्य वाटत आहे, तर ज्याठिकाणी जलवाहिन्याच टाकण्यात आल्या नाहीत, त्या ठिकाणच्या रहिवाशांची मात्र पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.

महाराष्ट्र जल प्राधिकरणामार्फत दोन्ही गावांत राबविण्यात येणारे पाणी योजनेचे सनियंत्रण अद्याप महापालिकेकडेच असून, वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेने या दोन्ही गावांतही सम व विषम तारखेला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी नियोजनानुसार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र, काही भागात तीन-चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी येत आहे. ज्या भागात अद्याप एमजीपीच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या नाहीत, त्या भागातील रहिवाशांना मात्र अद्याप पालिकेच्या टॅंकरवरच पाण्यासाठी गर्दी करावी लागत आहे.

आठवड्यातून फक्त दोनदाच पाणी, तेही कमी दाबाने व शिवाय फक्त अर्धा तास येते. त्यामुळे सर्वसामान्य रहिवाशांना पाण्यासाठी खासगी टॅंकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून, नगरपरिषदेचे चुकीचे व्यवस्थापन व राजकीय दबावापोटी काही सोसायट्यांना दिलेल्‍या दोन-दोन इंची पाणी जोडण्यांमुळे (कनेक्शन) सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहे‌.
राजाभाऊ होले, सामाजिक कार्यकर्ते, तुकाई दर्शन

महापालिकेने सुरू केलेल्या पाणी कपातीचा फटका येरवडा परिसरातील नागरिकांनाही बसू लागला आहे. काही भागांत कमी दाबाने पाणी येत आहे, तर काही ठिकाणी पाणीच पोहचत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

येरवड्यातील लक्ष्मीनगर आणि येरवडा गावठाण परिसरात सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास पाणी आले. मात्र, पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी असल्याने अनेकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. जय जवाननगर परिसरात पाणीच आले नाही. गांधीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

रहिवासी एजाज खान म्हणाले, सकाळी पाणीपुरवठा होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रहिवासी रमेश सकट म्हणाले की, पाणी पुरवठ्याचा दाब कमी असल्याने अनेक नागरिकांनी विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील काही भागात पाणीच पोहोचले नाही.

पावसाने ओढ दिल्याने पुणे शहरातील पाणीपुरवठा कपातीचा निर्णय महापालिका प्रशासन घेतलेला आहे. किमान पाऊस पडेपर्यंत तरी पाण्याचे नियोजन महापालिका करत आहे. परंतु, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अप्पर भागातील अनेक ठिकाणी अनधिकृत नळ जोडणी जोरात चालू आहे. याबाबत महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी अनभिज्ञ आहेत.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक ३९ मध्ये जवळपास ठेकेदारीवरील २१ कर्मचारी पाणी सोडण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाने तैनात केले असून अनेक कर्मचारीही माननीय यांचे जवळचे कार्यकर्तेच आहेत. एक मुकादम आणि कनिष्ठ अभियंता सोडला तर या भागात कायम स्वरुपी कर्मचारी नाही, त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा, नळ जोडणी इत्‍यादी कामकाजावर लक्ष ठेवणे महापालिकेलाही शक्य होत नाही. त्यामुळेच की काय या ठिकाणी अनधिकृत नळ जोडणीचा धंदा जोरात चालू आहे. ड्रेनेज लाईन व इतर विकासकामे करताना नळ कनेक्शन तुटले, असे कारण सांगून भरदिवसा नवीन टॅब मारून नळ जोडणी केली जात आहे. याबाबत चौकशी व माहितीसाठी विचारणा केली असता माननीय यांच्या नावाने उद्धट उत्तरे ठेकेदारी वरील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी देतात.

अप्पर येथील श्रेयस नगर, पवन नगर, पद्मावती नगर व अप्पर कोंढवा रस्त्यावर काही ठिकाणी अनधिकृत नळ जोडणी केली आहे, असे समजले, याबाबत तत्काळ माहिती घेऊन संबंधित सर्व टॅब मारलेले कनेक्शन बंद करण्यात येतील.
विज्ञान गायकवाड कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, बिबवेवाडी पुणे

पुणे महानगर पालिका पाणीपुरवठा विभागाची पाणीकपातीची योजना पाणीपुरवठा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने ठप्प झाली आहे. शंकर महाराज मठ-बिबवेवाडी (प्रभाग २०) व मुकुंदनगर- सॅलिसबरी पार्क (प्रभाग २१) मधील काही भागांत बुधवारी (दि. १७) पाणीच न आल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या भागात बुधवारी पाणीपुरवठा करण्याचा दिवस असतानासुद्धा अनेक सोसायट्यांमध्ये दुपारी २ वाजता पाणी आले व २ वाजून १० मिनिटांनी पाणी बंद झाले. याबाबत स्वारगेट पाणीपुरवठा अभियंता नितीन खुडे यांनी तांत्रिक अडचणीचे कारण माध्यमांना सांगितले. मंगळवारी (दि. १६) पाणीकपात असल्याने पाणी आले नव्हते, त्यात बुधवारी (दि. १७) पाणी नसल्याने अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांचे अतोनात हाल झाले.

नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्‍या संपर्क कार्यालयात संपर्क केला असता नगरसेवक महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभेला असल्याने संपर्क झाला नाही, तर त्यांच्या सहाय्यकांनी वेगळीच कारणे सांगून नागरिकांची बोळवण केली. बिबवेवाडी परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत तांत्रिक कारणास्तव अपेक्षित पाणीसाठा नसल्याने परिसरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही, यामुळे प्रशासनाच्‍या नियोजनातील अभाव पुन्हा चव्‍हाट्यावर आला आहे. बुधवारच्या पाणीपुरवठा समस्येला स्वारगेट पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक सोसायट्यांमधील नागरिकांनी व्यक्त केल्या, तर महिलांनी झालेल्या त्रासाबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींसह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्रागा व्यक्त केला. महर्षिनगर-सॅलिसबरी पार्कचे लोकप्रतिनिधी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, मनीषा चोरबेले, सिद्धी शिळीमकर यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही. तर, नगरसेवक प्रसन्न वैरागे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केला, टँकर पाठविले, असे सांगितले.

बुधवारी सकाळपासून पाण्याच्‍या प्रतीक्षेत होतो. दुपारी २ वाजता पाणी आले व दुपारी २.१० वाजता पाणी गेले. नागरिकांनी कशी समस्या सोडवायची? नगरसेवक कार्यालयात संपर्क केला असता रात्री उशिरापर्यंत टँकर आले नाहीत. मार्केटमध्येसुद्धा विकत पाणी टँकर न मिळल्याने अनेकांचे हाल झाले. या भागात पाणीपुरवठा ही वर्षानुवर्षांची समस्या आहे.
नंदकुमार भुजबळ, स्थानिक नागरिक, सॅलिसबरी पार्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT