पुणे: पुणेकरांना पाणीबचतीचे आवाहन करत महापालिकेने दि. १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे महापालिका मुख्यालयातच पाण्याचा वापर करताना काटकसर होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी (दि. १३) जागतिक आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त आयोजित मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन बंबातून पाण्याचा उंच फवारा सोडण्यात आला. यासाठी अंदाजे एक हजार लिटर पाणी वापरल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी मुख्यालयाच्या प्रवेशमार्गावरील गुटख्याचे डाग धुण्यासाठीही पाइपने पाणी सोडण्यात आले.
महापालिका मुख्यालयात आग लागल्याचा आभास निर्माण करून अग्निशमन दलाने हा सराव केला. प्रत्यक्ष आग लागल्यास तत्काळ प्रतिसाद देता यावा, हा या मॉक ड्रिलचा उद्देश होता. या सरावासाठी एकच अग्निशमन बंब वापरण्यात आला. त्यातून अंदाजे एक हजार लिटर पाणी वापरल्याची माहिती देण्यात आली. मात्र, हा आकडा अंदाजित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
वाहनधुलाईसह अनावश्यक कामांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये
एकीकडे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन प्रशासनाने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधुलाईसह अनावश्यक कामांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. अशा वेळी महापालिकेच्या मुख्यालयात पाणीवापराबाबत अधिक दक्षता घेतली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आगीच्या सरावासाठी पाणी वापरणे आवश्यक असले, तरी पाणीटंचाईच्या काळात त्याचे नियोजन आणि काटकसरीने वापर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यातच मुख्यालयाच्या पोर्चमधील गुटख्याचे डाग धुण्यासाठी पाइपने पाणी वापरल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी नेमके किती पाणी वापरले आणि पुनर्वापराचे पाणी उपलब्ध असताना पिण्याचे पाणी का वापरले, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
आग लागल्यानंतर पाणी लागणारच. पाणी न मारता आग कशी विझणार? अग्निशमन बंब वापरल्याशिवाय आग विझवता येणार नाही. आग विझविण्याच्या सरावासाठी पाण्याचा वापर आवश्यक आहे.गणेश सोनुने, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महापालिका