Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Pune Water Cut: पुण्यात दर गुरुवारी पाणीकपात; वर्षभरात ३.२१ टीएमसी पाणी वाचविण्याचे उद्दिष्ट

अल-निनो आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय; पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीबचतीवर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि आगामी काळात पुरेसा पाऊस पडण्याबाबत अनिश्चितता कायम असल्याने महापाललिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार १० टक्के पाणीबचत करण्यासाठी गुरुवारपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे वर्षाला तब्बल ३.२१ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. पुणेकरांना दररोज १७५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाणीबचतीमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या आधारे पुढील वर्षीही पुणेकरांना दिलासा मिळणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आणि अल-निनोमुळे उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा वापर नियंत्रित करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने पाणीबचतीसाठी आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी ही पाणीकपात केली जाणार आहे. शहराला दररोज होणारा सरासरी १७५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा लक्षात घेतल्यास, आठवड्यातील एका दिवसाच्या पुरवठ्याइतक्या पाण्याची बचत करून वर्षभरात सुमारे ३.१ टीएमसी पाण्याची बचत केली जाणार आहे.

मात्र, प्रत्यक्ष बचत किती होणार, हे पाणीपुरवठ्याच्या अंमलबजावणीवर आणि इतर दिवशी होणाऱ्या वापरावर अवलंबून राहणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरणसाखळीतून रोज १७५० एमएलडी पाणी उचलले जाते. महिन्याला ३० दिवसांचा विचार केल्यास १.८५ टीएमसी पाणी शहराला लागते. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास एकूण वापरात सुमारे १० टक्के कपात होण्याचा अंदाज आहे. या बचतीमुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ पुरविणे शक्य होईल. सामान्यतः महापालिका जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करते. मात्र, यंदा संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून ऑगस्टअखेरपर्यंतची गरज लक्षात घेऊन महापालिकेला पाण्याचे नियोजन करता येणार आहे.

.....असे आहे पाणीबचतीचे गणित

पुण्याला एका दिवसाला १७५० पाणी पुरवले जाते. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यास आठवड्याला १,७५० एमएलडी पाणीबचत होणार आहे. महिन्याला ७ हजार एमएलडी पाण्याची बचत यामुळे होणार आहे. तर वर्षातील ५२ आठवड्यांत एकूण ९१ हजार दशलक्ष लिटर पाणी वाचेल. एक टीएमसी म्हणजे सुमारे २८,३१६.८ दशलक्ष लिटर पाणी. त्यानुसार वर्षभयारात ३.२१ टीएमसी पाणीबचत होणार आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा कितीही असला, तरी त्याचे नियोजन केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही. ग्रामीण भागाची पाण्याची गरज, सिंचनासाठी होणारा विसर्ग आणि पुढील पावसाळ्यापर्यंतचा कालावधी यांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर करणे आणि अनावश्यक पाणीवापर रोखणे आवश्यक आहे.

गळती रोखल्याशिवाय बचतीचे उद्दिष्ट अपूर्ण

पाणीकपातीसोबतच वितरण व्यवस्थेतील गळती रोखणे, अनावश्यक वापरावर नियंत्रण ठेवणे आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढविणे यावरही महापालिकेला भर द्यावा लागणार आहे. नागरिकांनी घरगुती वापरात पाणी जपून वापरणे, गळणारे नळ त्वरित दुरुस्त करणे आणि वाहन धुणे किंवा इतर कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे गरजेचे आहे.

पुण्यासाठी या वर्षीची २१.३४ टीएमसी पाण्याची पालिकेची मागणी

पुणे महापालिकेने पुढील पावसाळ्यापर्यंत शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी जलसंपदा विभागाकडे २१.३४ टीएमसी पाण्याचे आरक्षण मागितले आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीबचतीमुळे वर्षाला ३.१ टीएमसी बचत होणार असून, वर्षभराच्या गरजेच्या सुमारे १४ ते १५ टक्के पाणी बचत करता येणार आहे.

पाणीबचतीतून जवळपास एका महिन्याच्या पाण्याएवढा साठा वाचविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून महापालिकेला अतिरिक्त महिन्याच्या पाणीपुरवठ्याची उपलब्धता मिळण्याची अपेक्षा आहे. पाण्याचा वापर नियंत्रित ठेवल्यास पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंत पुरवठ्याचे नियोजन करता येईल आणि अतिरिक्त उपलब्धतेमुळे ऑगस्ट महिन्याची गरजही भागविण्यास मदत होईल.
नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT