पुणे: शहरात सध्या सुरू असलेली १३ टक्के पाणीकपात पुरेशी असून, ती वाढवून २० टक्के करण्याची आवश्यकता नाही, असा दावा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा आणि शहराची आगामी महिन्यांतील गरज यांची आकडेवारी मांडत त्यांनी कपात वाढविण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
यासंदर्भात २८ ऑक्टोबरला जलसंपदा विभाग आणि सर्व राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी २० टक्के कपातीची सूचना केल्याच्या पार्श्वभूमीवर मंचाने आपली भूमिका मांडली आहे. मंचाच्या म्हणण्यानुसार, १५ ऑक्टोबरला खडकवासला धरणसाखळीत २५.६६ टीएमसी पाणीसाठा होता. कपात नसल्यास महापालिकेला दरमहा १.६ टीएमसी पाणी लागते.
१५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीत शहराची गरज १७.४० टीएमसी असेल. दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्याने सुमारे १३ टक्के बचत होऊन ही गरज १५ टीएमसीपर्यंत कमी होऊ शकते. पुण्यासाठी १५ टीएमसी पाणी राखीव ठेवल्यानंतर धरणसाखळीत १०.६६ टीएमसी शिल्लक राहील.
त्यातील तीन टीएमसी बाष्पीभवन गृहीत धरले, तरी सिंचनासाठी आणि दौंड- इंदापूर परिसरातील तलाव भरण्यासाठी ७.६६ टीएमसी पाणी उपलब्ध राहू शकते. रब्बी हंगाम, पुढील आवर्तने आणि आषाढी वारीसाठीही नियोजन करता येईल.
मुंढवा जॅकवेलमधून बेबी कालव्याद्वारे शेतीसाठी सुमारे पाच टीएमसी पाणी देणे शक्य असल्याचे वेलणकर यांनी नमूद केले. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत सध्याची कपात कायम ठेवावी, अशी मागणी मंचाने केली आहे. तसेच, पाणीगळती कमी करणे आणि समान पाणीपुरवठ्यासाठी गेल्या पाच वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतून काय साध्य झाले, याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही वेलणकर यांनी केली आहे.