Artificial Rain Pudhari
पुणे

Pune Artificial Rain: पाणीटंचाई गंभीर; पुणेकरांसाठी आता कृत्रिम पाऊस?

दोन महिन्यांपुरताच शिल्लक जलसाठा; दिवसाआड पाणीपुरवठ्यानंतर महापालिकेकडून क्लाऊड सीडिंगच्या शक्यतेचा अभ्यास सुरू

पुढारी वृत्तसेवा

pune artificial rain experiment

पुणे: जून महिना संपत आला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरावरील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत सध्या केवळ ३.६० टीएमसी जलसाठा शिल्लक असून, तो जास्तीत जास्त दोन महिनेच पुरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीकपातीनंतर आता पुणे महापालिकेने कृत्रिम पाऊस (क्लाऊड सीडिंग) हा पर्यायही गांभीर्याने तपासण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी (२९ जून) महापालिकेत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कृत्रिम पाऊस पाडण्याच्या शक्यतेवरही विचारविनिमय झाला. त्यानंतर महापौरांनी महापालिका आयुक्तांना या विषयाची संपूर्ण तांत्रिक माहिती गोळा करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंधरा दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, पाणीसाठा सातत्याने घटत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची चिंता वाढली आहे. सध्याचा साठा अवघ्या दोन महिन्यांसाठीच पुरेसा असल्याने पर्यायी उपाययोजनांचा शोध सुरू झाला आहे.

कृत्रिम पावसासाठी तांत्रिक अभ्यास सुरू

बैठकीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबवता येईल का, यावर चर्चा झाली. त्यानुसार आयुक्तांना विविध मुद्द्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या अहवालात यापूर्वी देशात किंवा राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग कुठे झाले, त्यांचे यशाचे प्रमाण किती होते, हा प्रयोग करण्यासाठी कोणत्या तज्ज्ञ संस्था किंवा एजन्सीची मदत घेता येईल, त्याचा अंदाजित खर्च किती असेल.

तसेच पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात क्लाऊड सीडिंगद्वारे पर्जन्य वाढवून जलसाठ्यात भर घालता येईल का? याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कृत्रिम पावसाचा प्रयोग प्रत्यक्षात राबवायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, या हालचालींमुळे पुण्यातील पाणीटंचाई किती गंभीर टप्प्यावर पोहोचली, हे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT