पुणे: शहरात सध्या ‘वॉटर एटीएम’च्या नावाखाली पाण्याचा काळाबाजार जोरात सुरू आहे. महापालिकेचे नळ आणि बेकायदा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून तेच पाणी बाटल्यांमध्ये भरून पुणेकरांना विकले जात आहे. विशेष म्हणजे, या वॉटर एटीएमवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही, ना या पाण्याची शुद्धता तपासली जाते. शुद्ध पाण्याचा बनाव करून अशुद्ध पाण्याचे वाटप केले जात असल्याने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुण्यात विविध भागांत मोठ्या प्रमाणावर वॉटर एटीएम उभारण्यात आले आहेत. मात्र, या यंत्रणांना परवानगी देण्यासाठी, त्यांची नोंदणी करण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेकडे ठोस धोरणच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता अनेक ठिकाणी पाण्याचा व्यवसाय सुरू आहे. यातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे या वॉटर एटीएममधून वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही हमी नाही. पाणी शुद्ध आहे की नाही, त्यावर आवश्यक ती प्रक्रिया केली जाते की नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
महापालिका हद्दीत किती पिण्याच्या पाण्याचे एटीएम आहेत, ज्यांद्वारे महापालिकेचे पिण्याचे पाणी दिले जाते की बोअरचे पाणी उपसा करून विकले जाते, अशा पाण्याच्या एटीएमला महापालिकेने रीतसर परवानगी दिली आहे काय? याची कुठलीही माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नाही. कर्वेनगर परिसरातील एका ‘वॉटर एटीएम’मधून वितरित होणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे अवघ्या एक रुपयात एक लिटर पाणी देणारे एटीएम मशिन सुरू असल्याचे दिसून आले. परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी राहत असल्याने स्वस्त दरातील पाण्यासाठी येथे मोठी गर्दी होते. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या पाण्याच्या गुणवत्तेबाबत पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. मात्र, अहवालानंतरही या ठिकाणी पाण्याची विक्री सुरूच असून, विद्यार्थी ते पाणी खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले.
महापालिकेचे पाणी अन् पुणेकरांचीच लूट
शहराच्या विविध गल्लीबोळांत आणि मुख्य चौकांत वॉटर एटीएमचे जाळे पसरले आहे. हे एटीएम चालविणारे अनेक जण महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन किंवा विनापरवाना बोअरवेलचे पाणी वापरतात. एकीकडे सामान्य पुणेकर पाण्यासाठी वणवण करीत असताना दुसरीकडे याच पाण्याचे ‘शुद्धीकरण’ केल्याचे भासवून 5 ते 20 रुपयांना लिटरप्रमाणे विक्री केली जाते.
सामान्यांच्या आरोग्याशी खेळ : यंत्रणा रामभरोसे!
वॉटर एटीएममधील पाणी खरोखरच पिण्यायोग्य आहे का? त्याची गुणवत्ता मानकानुसार आहे का? हे तपासण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. या मशिनमधील फिल्टर्स कधी बदलले जातात, तिथे स्वच्छता पाळली जाते का? याची साधी पाहणीही केली जात नाही. नुकत्याच काही भागांत वॉटर एटीएममधून अशुद्ध पाणी मिळाल्याच्या तक्रारी आल्या असून, यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा आणि पोटाचे आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
परवानगीचा पत्ताच नाही!
शहरात वॉटर एटीएम सुरू करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने नियमावली तयार केली आहे. नोंदणीकृत प्रयोगशाळेकडून पाणी तपासून त्याचा अहवाल पालिकेला देणे बंधनकारक आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. शहरात शेकडो वॉटर एटीएम असताना फक्त 25च्या आसपासची नोंद पालिकेकडे आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
पुण्यात वॉटर एटीएमद्वारे पाण्याची विक्री करण्यास परवानगी आहे का? शहरात किती वॉटर एटीएम कार्यरत आहेत? आणि त्यांना अधिकृत परवानगी आहे का? दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाने संयुक्त पाहणी करून तत्काळ कारवाई करावी.संदीप खर्डेकर, अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन
शहरात वॉटर एटीएम सुरू करण्यासाठी नियमावली आहे. या नियमावलीचे पालन करणाऱ्यांनाच परवानगी दिली जाते. पाणी शुद्ध आहे की नाही, हे संबंधित व्यावसायिकानेच देणे गरजेचे आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. अनेकांच्या तक्रारी येत असल्याने आता या वॉटर एटीएमची तपासणीची मोहीम आम्ही लवकरच सुरू करू.नंदकिशोर जगताप, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग महापालिका